Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल १० वर्षे खडी फोडायला जाणार

तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल १० वर्षे खडी फोडायला जाणार

NEWS डंका 2 weeks ago

सहकारी पत्रकार महिलेवर अत्याचाराचा होता आरोप

तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवल्यानंतर आता १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावताना तेजपाल यांना दोन आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले.

संबंधित प्रकरण नोव्हेंबर २०१३ मधील आहे. गोव्यात आयोजित 'थिंकफेस्ट' कार्यक्रमादरम्यान एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेहलकामध्ये कनिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या महिलेवर तरुण तेजपाल यांनी दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. घटनेनंतर पीडितेने संस्थेच्या व्यवस्थापनाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर गोवा पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली.

मे २०२१ मध्ये गोवा सत्र न्यायालयाने पुराव्यांतील त्रुटी आणि तपासातील विसंगतींचा आधार घेत तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, या निर्णयाला गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सत्र न्यायालयाने पुराव्यांचे चुकीचे मूल्यमापन केल्याचा युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करताना खालच्या न्यायालयाने पीडित महिलेच्या साक्षीकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्याचे नमूद केले. उपलब्ध पुरावे आणि साक्षींचे मूल्यमापन कायद्याच्या निकषांनुसार करण्यात आले नसल्याने निर्दोष मुक्ततेचा निकाल टिकू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली दोषी ठरवले.

भाजपने नव्हे; काँग्रेसच्या आयटी सेलनेच आम्हाला खूप ट्रोल केले!

माफिया अतीक अहमदचा मुलगा अबानचा भीषण अपघातात मृत्यू

लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी

पुणे विषारी दारू प्रकरणी सूत्रधारासह संपूर्ण टोळीवर मकोका

सुनावणीदरम्यान गोवा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तेजपाल यांना कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपी हा पीडितेच्या विश्वासाच्या स्थानावर होता आणि त्याने त्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयासमोर केला. बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली होती. शिक्षा सुनावल्यानंतर तरुण तेजपाल यांनी आपण राजकीय सूडबुद्धीचे बळी ठरलो असल्याचा दावा केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka