ईडीची कारवाई
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (टीटीडी) लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपातील कथित भेसळीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. 'सुकृती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड'चे प्रवर्तक कैलाश चंद मंगला यांना ईडीने अटक केली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित या प्रकरणात हैदराबाद येथील ईडी कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना विशाखापट्टणम येथील विशेष आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ईडीच्या तपासानुसार, टीटीडीला 'ऍगमार्क विशेष दर्जाचे गायीचे तूप' म्हणून पुरवण्यात आलेले तूप कथितरीत्या शुद्ध दुधापासून तयार करण्यात आले नव्हते. या तुपाच्या निर्मितीसाठी शुद्ध केलेले पामतेल, पामकर्नेल तेल, पामोलिन तसेच एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हॅसेट सॉफ्ट ४०० आणि ऍसिटिक ऍसिड एस्टर यांसारख्या घटकांचा वापर करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
माहितीनुसार, २०१९ ते २०२४ या कालावधीत टीटीडीला पुरवण्यात आलेल्या कथित भेसळयुक्त तुपाची एकूण किंमत सुमारे २३० कोटी रुपये होती. यापैकी सुमारे ९६ कोटी रुपयांचे कथित भेसळयुक्त तूप मंगला यांच्या कारखान्यात तयार करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, मंगला हे या कथित गैरव्यवहारातील सहभागी होते. भेसळीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची खरेदी सुलभ करण्याबरोबरच त्यांच्या कारखान्यात कथित भेसळयुक्त तूप तयार करण्यात आले. त्यानंतर श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स आणि ए.आर. डेअरी फूड्स या संस्थांच्या माध्यमातून या तुपाचा पुरवठा करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. तूप आणि शुद्ध केलेल्या पामतेलाच्या खरेदी-विक्रीशी संबंधित बनावट कागदपत्रे आणि नोंदी तयार करण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे. या नोंदींच्या माध्यमातून भेसळीसाठी वापरण्यात आलेल्या घटकांचा प्रत्यक्ष वापर लपवून, शुद्ध गायीच्या तुपाचे उत्पादन आणि पुरवठा झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ
मराठमोळ्या 'गोंधळ'ची यंदा ऑस्करवारी
दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये मशिदीत नमाजावेळी स्फोट
या प्रकरणात ईडीने यापूर्वी 'भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी मिल्क'चे प्रवर्तक आणि संचालक विपिन जैन यांनाही अटक केली आहे. कैलाश चंद मंगला यांची अटक ही या प्रकरणातील तपासाचा पुढील टप्पा आहे. कथित भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याशी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच या प्रकरणातील इतर व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सध्या सुरू आहे.

