एक गंभीर आजारी, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
वाकोला परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटी समोरील महापालिकेच्या ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या दोन खासगी सफाई कामगारांना विषारी वायूची बाधा झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली.
या दुर्घटनेत एका कामगाराचा गुदमरून जागीच मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील रोड क्रमांक ८ वर असलेल्या एका सोसायटीची गटर लाईन ब्लॉक झाली होती. ती साफ करण्यासाठी सोसायटीकडून खासगी कामगारांना पाचारण करण्यात आले होते. सकाळी ११ च्या सुमारास सोसायटीचे गटर साफ करत असताना रस्त्यावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) चेंबरमध्ये दोन कामगार उतरले. मात्र, चेंबरमधील साठलेल्या विषारी वायूमुळे दोघांचीही प्रकृती खालावली आणि ते गुदमरले.
केतनच्या लग्नासाठी सिया गोयलला ८ लाखांचे कपडे, ८० लाखांचे दागिने
मुंबईत ड्रग्ज तस्करी टोळीकडून ३७.१७ कोटींचे 'केटामाईन' जप्त
अँटिलिया प्रकरणातला सूत्रधार सचिन वाझेला जामीन
चीनच्या बीआरआयला भारताचा 'पॉवर काउंटर'
या घटनेत संतोष गणपत काष्टे (वय ४७, मूळ रा. दापोली, जि. रत्नागिरी; सध्या रा. गोळीबार झोपडपट्टी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला दुसरा कामगार अजय ध्यानचंद ठाकूर (वय २६, मूळ रा. मुरेना, मध्य प्रदेश; सध्या रा. फूटपाथवर) हा गंभीर आजारी आहे. अजय ठाकूर याला तात्काळ नजीकच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कोणतीही पुरेशी सुरक्षा उपकरणे न पुरवता कामगारांना चेंबरमध्ये उतरवल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदार विलास पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

