Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी महागात

विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी महागात

NEWS डंका 1 month ago

पोलीस कर्मचारी पवन सांगळे निलंबित

विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या मुंबई पोलिसातील कर्मचारी पवन सांगळे याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सांगळे हा आंदोलक विद्यार्थ्याला 'पुन्हा दिसलास तर तुझ्या खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन' अशी धमकी देताना दिसत असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहखात्याने तातडीने कारवाई करत त्याला निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत.

या घटनेचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत करत पोलिसांच्या वर्तनावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'पोलिसांकडे अशी पावडर कुठून येते? हा पोलीस स्वतः ड्रग्ज पुरवठादार आहे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर काही तासांतच गृहखात्याने संबंधित पोलिसाविरुद्ध कारवाईची घोषणा केली.

ट्रेड डीलचा ताण की आर्थिक दबावतंत्र?

पवन सांगळे हा सायन पोलिस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित झाले. वाढत्या जनक्षोभाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथम त्याची बदली केली आणि त्यानंतर निलंबनाची कारवाई करत विभागीय चौकशी सुरू केली. चौकशीनंतर पुढील शिस्तभंगात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनेही या प्रकरणात पोलिस महासंचालकांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिस कर्मचारीच '५० ग्रॅम पावडर'ची भाषा करत असल्याने राज्यातील अंमली पदार्थांच्या साखळीबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे आंदोलकांशी पोलिसांचे वर्तन, कायद्याचा गैरवापर आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या कारवाईचे स्वागत होत असून पोलिस दलातील शिस्त आणि उत्तरदायित्व अधिक कठोर करण्याची मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka