Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात.

भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात.

पुणे : अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते याने फॉर्च्युनर कारने मंचरजवळ शनिवारी (ता. २२) रात्री दुचाकीस्वाराला चिरडले असून, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलेले नव्हते, असा दावा आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडले. या घटनेत ओम भालेराव (वय 19) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील पोर्शे अपघातानंतर आणखी एक भीषण अपघात मंचर जवळ झाला आहे. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वैद्यकीय अहवालामध्ये नेमकं काय आढळतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असे स्थानिकांनी सांगितले आहे. यासर्व चर्चांवर मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्यपानही केलेले नव्हते. माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. पोलिस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट 100 टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी वातावरण शांत झालं की, स्वतः कुटुंबाची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करणार नाही.’

‘माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे, तो दारू पित नाही. तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्याने त्याच्या आयुष्यात केलेले नाहीत तसेच अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हते. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेले नाही. पोलिस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्याने अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन, असेही मोहिते पाटील म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka