बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे.
लोकसभा निवडणुकीपासून मराठी विरुद्ध वंजारी हा सुरु झालेला वाद देशमुख हत्याप्रकरणानंतर आणखी उफाळला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड पोलीस अधीक्षकांना बीड मधील जातीयवाद कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक अनोखा आदेश लागू केला. यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानेच बोलवायचे, आडनाव घ्यायचे नाही, असे आदेशात म्हटले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये काही आंदोलकांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर वंजारी समाजात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या होत्या. त्यामुळे बीडमधील सामाजिक परिस्थितीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
The post बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

