बीडः बीडच्या जिल्हा कारागृहात दोन गटात राडा झाला असून, बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपीही याच कारागृहात आहेत.
बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या गटांमध्ये अचानक वाद झाला आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवत मारामारी केली. हा प्रकार घडताच तुरुंगातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. या दोन गटांमध्ये कोणते कैदी सामील होते, याबाबतही स्पष्टता नाही. बीडमध्ये दोन गटात हाणामारी झाली असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडल्याची माहिती पुढे आली आहे.
कारागृहात आज सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या राड्यात सुदर्शन घुले याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर वाल्मीक कराड यालाही कानशिलात लगावण्यात आली. याच तुरुंगात असलेल्या महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कराडला मारहाण करणारा महादेव गीत्ते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जेलमधील VIP ट्रीटमेंटही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असताना हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
The post बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

