नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेतल्याची घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून केला. तसेच स्वत:ही गळफास घेत जीवन संपविले. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना योगमहाल अपार्टमेंट, नाशिकरोड या भागात उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वप्निल गायकवाड यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. पत्नीसोबत वारंवार वाद होत असल्याने, त्यांनी घटस्फोट घेतला होता. तर मुलीचा त्यांच्याकडे ताबा होता. याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले असावे, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी भेट देऊन माहिती घेतली.
पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड यांच्या एका भावाचा काही वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली होती. आता पोलिस कर्मचारी असलेले स्वप्निल यांनी जीवनयात्रा संपवल्याने कुटुंबात केवळ त्यांचे वृद्ध आई-वडील उरले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहर पोलिस :
The post धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

