सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेवून जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. रश्मी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉ. रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसमवेत राहात होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीने फोन करून ही घटना कळवली.
घटनेची माहिती होताच संतोष बिराजदार यांनी घराकडे धाव घेतली. डॉ. रश्मी बिराजदार यांना बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
The post धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

