Dailyhunt
गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय.

गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय.

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर जखमी व्यक्तीच्या घरच्यांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते.

या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील हिने बुधवारी (ता. ८) पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कार अपघातावेळी गौतमी पाचील कारमध्ये होती असाही आरोप होता, त्यानंतर भाजप नेते अन् राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यास फोन लावून गौतमी पाटील हिला उचलणार आहात की नाही, अशी विचारणा केली. याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी केलेली चौकशी आणि तांत्रिक बाबी तपासल्यानंतर गौतमी त्या अपघातावेळी कारमध्ये नसल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील हिने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

गौतमी म्हणाली, 'देवदर्शनासाठी जातो म्हणून तिच्या कार चालकाने तिची गाडी नेली होती. त्यानंतर त्याच्याकडून तो अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जे वागला ते चुकीचे आहे. मात्र, अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केले जात आहे. ट्रोल होणं माझ्यासाठी काही नवीन नाही. मात्र, अशा प्रकारे मी तिथे उपस्थित नसताना देखील मला दोष देणं चुकीचे आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता, हा आरोप चुकीचा आहे.'

चंद्रकांत पाटील यांना अपघाताच्या संदर्भात सविस्तर माहिती नव्हती, त्यामुळे ते गौतमी पाटीलला उचलणार की नाही? असे पोलिस अधिकाऱ्यांना बोलले. मात्र, समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. मात्र, दादांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले. समोरून लाखो रुपयांची मागणी करणारे निरोप येत आहेत. माझ्याशी अद्याप थेट कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यांची मागणी माझ्या आवाक्या बाहेरची आहे. त्यामुळे जे काय होईल ते कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल, असेही गौतमी पाटील म्हणाली.

अपघातानंतर कारवाई ही नेहमी चालकावरच होते, मग गाडीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी अन्यायकारक आहे. दररोज अनेक अपघात घडतात, पण त्यात गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल केला जात नाही, कारवाई चालकावरच होते. मी कलाकार असल्यामुळे माझ्यावर मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. अपघाताच्या वेळी मी त्या गाडीत नव्हते, तरीही मला दोषी ठरवले जात आहे, हे समजत नाही. अपघातानंतर पोलिसांना आवश्यक सर्व माहिती आणि कागदपत्रे मी दिली आहेत. आतापर्यंत पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून, पुढेही तेच करत राहणार आहे. दादांना (माझ्या भावांना) अपघाताबद्दल सुरुवातीला काही माहिती नव्हती. त्यांनी फोन करून विचारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व तपशील त्यांना मिळाला. त्यामुळे त्या विषयावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाईट वाटले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला सर्वच बोलतात. मला कोणी चांगले म्हणतच नाहीत. सगळे वाईटच बोलतात. दोषी नसतानाही मला दोष देण्यात येत आहे, असेही गौतमी पाटील हिने म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka