मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मृतांमध्ये एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिचा समावेश आहे.
रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे नियोजन होते. डोंबिवलीच्या रोशनीने गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे ड्रीमलायनरमधून उड्डाण केले होते. इंटरनॅशनल विमानात सेवा देण्याची ही पहिलीच संधी, ही संधी तिची अखेरची ठरली आणि डोक्यावर अक्षता पडण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.
डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील नव उमिया कृपा सोसायटीत रोशनी सोनघरे ही तिच्या कुटुंबासह राहत होती. मूळचे ग्रॅण्ट रोडचे असलेले सोनघरे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले होते. मुंबईतील एका युवकासोबत तिचे लग्न ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. लहानपणापासून एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रोशनीने ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही साकारले होते. सुरुवातीला स्पाईस जेट व त्यानंतर एअर इंडियात ती भरती झाली होती. गुरुवारी अहमदाबादमधून टेकऑफ घेतलेल्या ड्रीमलायनर विमानात तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय ड्युटी. त्यामुळे ती प्रचंड खुशीत होती. पण विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.
रोशनीने सोशल मीडियावर 'स्काय लव्ह हर' या नावाने आपली ओळख निर्माण केली होती. ती सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 60 हजार फॉलोअर्स होते. 'स्काय लव्ह हर' या युजर नेमने ती विमान प्रवास, सौंदर्य, जीवनशैली आणि तिच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित व्हिडीओ शेअर करीत असे. तिच्या निधनामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
The post हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

