पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित युवतीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिला विधी सेवा प्राधिकरणाकडून 'मनोधैर्य' योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
पुणे शहर परिसरातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर रोजी मित्रासोबत फिरायला गेलेल्या युवतीला कोयत्याचा आणि शस्त्रांचा धाक दाखवून 3 युवकांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी सर्व माहिती सांगितली असून त्यांनी घटनास्थळ देखील दाखवले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेतील पीडितेला आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 'मनोधैर्य' योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित युवतीने विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. अर्ज दिल्यानंतर नऊ दिवसांमध्ये संबंधित अर्ज मंजूर झाला आहे.
नुकसान भरपाईसाठी मिळणाऱ्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही दहा वर्षांसाठी पीडितेच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून ती उपचार घेऊ शकणार आहे, त्याचबरोबर इतर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मदत होईल.
मनोधैर्य योजनेबाबत…
एखाद्या घटनेतील पीडित बालक किंवा महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी 'मनोधैर्य' योजना सुरू करण्यात आलेली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होते. संबधित पीडितेला कमीत कमी 30 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. पीडित महिलांना आधार आणि धैर्य मिळण्यासाठी या योजनेची सुरूवात करण्यात आली होती.
The post मनोधैर्य योजना! 'बोपदेव घाट' प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

