Dailyhunt
नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे.

नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे.

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे.

दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली.

अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत गावाकडे जात असताना, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धडकेनंतर अल्टो कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. कारमध्ये पाणी भरल्यामुळे नाका व तोंडात पाणी गेल्याने श्वास घेता न आल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
देविदास पंडित गांगुर्डे (28), मनीषा देविदास गांगुर्डे (23), भावेश देविदास गांगुर्डे (2) हे तिघे सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी आहेत. तसेच, उत्तम एकनाथ जाधव (42) व अल्का उत्तम जाधव (38) हे कोशिंबे, ता. दिंडोरी येथील रहिवासी असून, दत्तात्रेय नामदेव वाघमारे (45) व अनुसया दत्तात्रेय वाघमारे (40) हे देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी येथील रहिवासी होते.

अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे…
या अपघातात मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे (25) आणि अजय जगन्नाथ गोंद (18) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय गोंद हे मूळचे नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर येथील असून सध्या ते सातपूर येथील भोला पिंपळगाव परिसरात राहतात.

The post नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka