मुंबई: मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे (वय ३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी ७.४१च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर गर्दीमुळे कोपर दरम्यान पडून त्यांचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. पण, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, रोहित किलगे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. रेल्वेमध्ये गर्दी वाढत असून प्रवाशांनी स्वतःची तसेच सहप्रवाशाची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
The post पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

