पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये धनिक पुत्राने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दोघांचा बळी घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहण्याची 'कठोर' शिक्षा सुनावून जामीन मंजूर केला होता.
बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका करण्यात आल्याचा अहवाल महिला अणि बाल विकास विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानंतर या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली असून चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर या सदस्यांवर काय कारवाई करायची हे ठरविण्यात येईल, असे महिला अणि बालकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केले होते.
कल्याणी नगरमधील पोर्शे अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनवडे यांनी जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना एल.एन. धनवडे यांनी या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, समुपदेशकांची मदत घेणे अशी किरकोळ शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीकेचा सुर उलटल्यानंतर महिला अणि बालकल्याण विभागाच्या वतीने या निर्णयाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या 100 पानी अहवालात चुका झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल महिला व बालविकास आयुक्तांना प्राप्त झाला आहे.

पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला आधी जामीन देणारे बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल एन धनवडे यांना महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी नोटीस बजावली होती. त्यावर धनवडे यांनी दिलेल्या उत्तरानंतर प्रशांत नारनवरे यांच्याकडून काय निर्णय घेतला जाणार हे आता स्पष्ट होईल. पोर्शे कार अपघातानंतर धनिकपुत्राला बालहक्क न्यायमंडळासमोर सादर करण्यात आले तेव्हा त्याच्या शिक्षेबाबातचा निर्णय हा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे होता. मात्र, केवळ एकाच सदस्याने हा निर्णय दिला. या सगळ्याबाबत आता बालहक्क न्यायमंडळाच्या सदस्यांना जाब विचारण्यात येईल.
धनिकपुत्राला बालहक्क न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर त्याला सुनावण्यात आलेल्या अजब शिक्षेची चांगलीच चर्चा झाली होती. यावरुन प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतर कारवाईला वेग आला होता. बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनवडे यांनी आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने 300 शब्दाचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल, अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत, असे निर्देश दिले होते. तसेच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते.
payal-mehandiThe post पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

