पुणे : पुणे पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील तब्बल ५ वेगवेगळ्या हायटेक अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी केली. पोलिसांच्या २०० जणांच्या फौजफाट्याने सलग १७ तास चालवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले गेले.
हे रॅकेट रोज तब्बल ३०० ते ४०० निष्पाप नागरिकांना फोन करून आर्थिक लुट करत होते.
पुणे शहरात बसून सुशिक्षित युवकांना जाळ्यात ओढणारे हे रॅकेट प्रत्यक्षात पुण्यातून नाही, तर थेट दुबईतून ऑपरेट केले जात होते. मुंढवा पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी सलग १५ दिवस लक्ष ठेवून माग काढला आणि एकाच रात्रीत या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य मास्टरमाईंड अमित मजेठिया हा आहे. तो भारतात न राहता थेट दुबईत बसून सूत्रे हलवत होता. तर त्याचा सर्वात विश्वासू साथीदार भागीरथ पांड्या हा पुण्यात राहून या फसवणुकीतून येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या पैशांचे व्यवहार सांभाळत होता. पोलिस आता या दोघांच्या मुसक्या आवळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करत आहेत.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात थेट एक पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय, कोट्यवधी रुपयांचे तांत्रिक साहित्य हस्तगत केले आहे. नागरिकांना गोड बोलून फसवणुकीच्या जाळ्यात कसे ओढायचे, याची ट्रेनिंग देणारी 'कॉल स्क्रिप्ट'ही इथे आढळून आली आहे. सायबर गुन्हेगार हे 'अॅमनोरा चेंबर्स', 'अॅमनोरा मॉल' आणि फुरसुंगी भागातील आलिशान कार्यालयांमध्ये बसून नागरिकांना फोन करायचे. सुरुवातीला ऑनलाईन गेममध्ये लोकांना मुद्दाम काही पैसे जिंकवून दिले जायचे, जेणेकरून त्यांचा विश्वास बसेल. एकदा का नागरिकांचा विश्वास बसला की, त्यांना लाखो रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडायचे. धक्कादायक म्हणजे, पैसे गमावलेल्या लोकांना "आम्ही तुमचे बुडालेले पैसे परत मिळवून देतो" असे आमिष दाखवून त्याच लोकांकडून पुन्हा दुसऱ्यांदा पैसे उकळले जायचे.
आंतरराष्ट्रीय रॅकेटला उद्ध्वस्त करण्यामागे मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलिस अंमलदार योगेश राऊत यांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत आणि गुप्त तपास केला होता. त्यांना या फसवणुकीची अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पुरावे गोळा केले. त्यानंतर सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ही मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. फुरसुंगी), विनायक उर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०) यांच्यासह निदा अन्सारी, पूनम भालके, अनुजा जाधव, रवींद्र कुरळे, अक्षय पाटील, विवेक जाधव, प्रांजल मिश्रा आणि सागर उसरे यांच्यावर गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…
पुणे पोलिसांचे बुधवार पेठेतील महिलांना दोन प्रश्न अन् झाली पोलखेल…
पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…
पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…
Video: पुणे पोलिस दलातील 'मार्शल' ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…

