पुणे: पुण्यातील सायबर गुन्हेगारीच्या जगात एक धक्कादायक 'चीन कनेक्शन' समोर आले असून, एका लोकप्रिय रिल स्टारचा सहभाग उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी हर्षद सुभाष धंतोले (वय २३, बी.टेक विद्यार्थी) आणि समर्थ सुरेश देशमुख (२४) या दोघांना अटक केली आहे.
कर्वेनगर येथील बी.टेकचा विद्यार्थी असलेल्या हर्षद धंतोले याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या शिक्षित युवकांनी ऑनलाईन फसवणुकीचे जाळे विणले होते. भांडारकर रोडवरील एका ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून धमकावण्यात आले. बनावट 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणाची भीती दाखवून वृद्धाला 'व्हर्च्युअल कोर्टरूम'मध्ये डिजिटल अरेस्ट करण्यात आले आणि विविध खात्यांवर १०.७५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या एका रील स्टारचा मुख्य सहभाग आहे. हा रील स्टार मुख्य संशयितांच्या सूचनेवरून पैशांची अफरातफर करण्यासाठी 'म्युल अकाउंट्स' (भाड्याने घेतलेली बँक खाती) गोळा करण्याचे काम करत होता. मोठी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली असून तो सध्या फरार आहे.
या प्रकरणात रील स्टारच्या एका मैत्रिणीचीही चौकशी करण्यात आली आहे. ती व्हिडिओमध्ये विविध ऑनलाईन फिल्टर्स वापरून चेहरा बदलत असे, जेणेकरून तरुणांची ओळख पटू नये. तिच्या खात्यातही फसवणुकीची रक्कम जमा झाली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट चीनशी जोडले गेले असल्याने सायबर पोलिस आता अधिक सखोल तपास करत आहेत.

