(संतोष धायबर; santosh.dhaybar@gmail.com)पुणे : पुणे-नगर महामार्गावर सध्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. चंदननगर-खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
चंदननगर-खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्याच्या कडेला तसेच मध्येच उभ्या करून प्रवासी घेत असतात. अचानक लेन बदलणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. ट्रॅव्हल्स गाड्या पूर्णपणे रस्ता अडवत असल्यामुळे इतर वाहन धारकांना जीव मुठीत धरून थांबावे लागते. या भागात रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने इतर वाहनांना पुढे जाण्यास जागाच मिळत नाही. अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असूनही याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिस कारवाई का करत नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमभंग सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. काही नागरिकांमध्ये तर ‘वाहतूक पोलिस हप्ते घेतात का?’ अशी उघड चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ट्रॅव्हल्स गाड्यांसाठी ठरावीक थांबे निश्चित करणे, रात्रीच्या वेळी कठोर वाहतूक नियंत्रण राबवणे आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.

