Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा.

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा.

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत.

हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली.

पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिक जखमी झाले आहेत. शिवाय, १३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपविण्यात यश आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार, उखळी तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. यात भारतीय जवान हुतात्मा झाला आहे.

पाकिस्तानने पूँछमध्ये केलेल्या गोळीबारात जवान दिनेश कुमार शर्मा (रा. हरियाणा) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्मा यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतू यात अपयश आले. भारतीय सैन्याने याची माहिती दिली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले सुरुच आहेत. पुँछ, राजौरी आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात हा गोळीबार सुरु ठेवला आहे. यात आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरिदके आणि बहावलपूर येथील लष्करी तळांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे अनेक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हाफिझ अब्दुल रौफ हा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे काही अधिकारी आणि पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर हाफिझ अब्दुल रौफ हा ऑपरेशन सिंदूरदरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka