Dailyhunt
तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात.

तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात.

बुलढाणा : मोताळा तालुका येथील तहसीलदार हेमंत पाटील याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रविवारी (ता. १४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आणि अटक केली आहे. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी तहसीलदाराने लाचेची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र, एसीबीने तत्काळ कारवाई करत ही रक्कम जप्त केली.

मोताळा तालुक्यातील थड येथील एका शेतकऱ्याला त्यांच्या गट क्रमांक २३ मधील १.६२ हेक्टर शेतजमीन त्यांच्या भाच्याला विकायची होती. या व्यवहारासाठी सौदेपत्रक तयार करण्यात आले होते. ही जमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची गरज होती, जेणेकरून विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांचा भाचा या कामासाठी तहसीलदार हेमंत पाटील याला भेटला. याच संधीचा फायदा घेत तहसिलदाराने या कामासाठी प्रति एकर ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने तक्रारीची गंभीर दखल घेत १३ सप्टेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे, रविवारी (ता. १४) दुपारी तक्रारदाराने तहसीलदार पाटील याला त्याच्या निवासस्थानी दोन लाख रुपये दिले. जसे ही रक्कम पाटील यांनी स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच पाटील याने लगेच ती रक्कम शौचालयात फेकून दिली, परंतु एसीबीने ती तत्काळ हस्तगत केली. लाचखोर हेमंत पाटील विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

महापालिका उपायुक्त लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात…

The post तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka