Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयएचसीएलचा तिमाही महसूल वाढला १५ टक्क्यांनी

आयएचसीएलचा तिमाही महसूल वाढला १५ टक्क्यांनी

आयएचसीएलचा तिमाही महसूल वाढला १५ टक्क्यांनी

मुंबई : देशातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत महसूल आणि नफ्यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली आहे.

एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल १५ टक्क्यांनी वाढून ₹२,४१९ कोटी, तर निव्वळ नफा (PAT) २१ टक्क्यांनी वाढून ₹३५८ कोटी झाला.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छतवाल यांनी सांगितले की, आयएचसीएलने सलग सतराव्या तिमाहीत सर्वोत्तम आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीचा EBITDA ₹७५३ कोटी असून EBITDA मार्जिन ३१.१ टक्के राहिले आहे.

देशांतर्गत समान हॉटेल्समधील RevPAR (प्रति उपलब्ध खोली महसूल) मध्ये १४ टक्के वाढ, ग्रोथ बिझनेसच्या महसुलात २२ टक्के वाढ आणि व्यवस्थापन शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात २६ टक्के वाढ झाल्यामुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

तिमाहीत कंपनीने २० नवीन हॉटेल्सचे करार केले असून ११ नवीन हॉटेल्स सुरू केली आहेत. त्यामुळे आयएचसीएलच्या एकूण पोर्टफोलिओतील हॉटेल्सची संख्या ६४५ वर पोहोचली असून त्यापैकी २६३ हॉटेल्स विकासाच्या टप्प्यात आहेत. या कालावधीत फ्रँकफर्ट, दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क, अयोध्या आणि मुंबईसह विविध ठिकाणी नवीन हॉटेल्स सुरू करण्यात आली.

कंपनीनुसार, 'ताज' या ब्रँडने १५० हॉटेल्सचा टप्पा गाठला असून, ब्रँड फायनान्स इंडिया १००-२०२६ अहवालानुसार तो सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वात मजबूत ब्रँड ठरला आहे.

आयएचसीएलचे मुख्य वित्त अधिकारी अंकुर दलवानी यांनी सांगितले की, स्वतंत्र व्यवसायातून कंपनीने ₹१,२९८ कोटींचा महसूल नोंदवला. EBITDA मार्जिन ४१.८ टक्के राहिले असून स्वतंत्र व्यवसायाचा निव्वळ नफा ₹३३७ कोटी झाला. गोवा, दिल्ली आणि बेंगळुरू येथील नूतनीकरण केलेल्या मालमत्तांनी या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.

३० जून २०२६ अखेर कंपनीकडे ₹४,४३९ कोटींची रोख शिल्लक असून आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ग्रोथ बिझनेस विभागात Ginger, Qmin, amã Stays & Trails आणि Tree of Life या व्यवसायांचा एकत्रित महसूल ₹३५० कोटी झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ६५ टक्के अधिक आहे. यापैकी Gingerचा महसूल ६८ टक्क्यांनी वाढून ₹३०१ कोटी, तर Qminचा महसूल ₹६० कोटी झाला असून देशभरात त्याची १०० हून अधिक आउटलेट्स कार्यरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat