Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'अनुवाद हा दोन भाषांमधील सांस्कृतिक पूल'

'अनुवाद हा दोन भाषांमधील सांस्कृतिक पूल'

'अनुवाद हा दोन भाषांमधील सांस्कृतिक पूल'

णजी : "अनुवाद हा दोन भाषांमधील सांस्कृतिक पूल असतो. कितीही पाऊस पडला तरी हा पूल कोसळत नाही. उलट तो दोन भाषा, दोन संस्कृती आणि दोन समाजांना जोडण्याचे कार्य करतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अॅड.

उदय भेंब्रे यांनी केले. साहित्य अकादमी प्रकाशित काश्मिरी निबंधसंग्रह 'विचारकण'च्या कोंकणी अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि विकासिनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला साहित्यिक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदय भेंब्रे यांनी 'विचारकण' हे पुस्तक वैचारिक स्वरूपाचे असून त्यामध्ये तत्त्वज्ञानाचा गाभा असल्याचे सांगितले. पुस्तकातील विचार मानवी जीवनाला नवी दृष्टी देणारे असून, अनुवादक संपदा कुंकळकर यांनी त्या विचारांचा आशय कोंकणीत समर्थपणे साकारला आहे. त्यामुळे मूळ पुस्तकातील वैचारिक खोली आणि संवेदनशीलता अनुवादातही तितक्याच प्रभावीपणे व्यक्त झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुवादक संपदा कुंकळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, काश्मिरी लेखक डॉ. अजुरदाह यांच्या या पुस्तकाला १९८४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. दशकांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही तितकेच समकालीन वाटते. त्यातील विचार काळाच्या कसोटीवर टिकून राहिले असून, समाजाला विचार करण्यास भाग पाडतात. "अनुवाद हा उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्यासारखा असतो; तो दोन्ही बाजूंना समान प्रकाश देतो," असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात भारतीय भाषांमधील साहित्याचे परस्पर भाषांतर हे केवळ शब्दांचे रूपांतर नसून संस्कृती, विचार आणि अनुभव यांची देवाणघेवाण असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विविध भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्य अधिक व्यापक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुवादाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिनेश मणेरकर, ज्योती कुंकळकर, सुलक्षा कोळमुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या नायक यांनी केले. सुलक्षा कोळमुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर ज्योती कुंकळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat