Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कायदा-सुव्यवस्थाप्रश्नी काँग्रेसने घेतली राज्यपालांची भेट

कायदा-सुव्यवस्थाप्रश्नी काँग्रेसने घेतली राज्यपालांची भेट

कायदा-सुव्यवस्थाप्रश्नी काँग्रेसने घेतली राज्यपालांची भेट

णजी : गोव्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचा आरोप करत काँग्रेसने गुरुवारी राज्यपाल पुष्पती अशोक गजपती राजू यांची भेट घेत हस्तक्षेपाची मागणी केली.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फेरेरा, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष शशांक नार्वेकर यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर केले.

निवेदनात सीमावर्ती तपासणी नाक्यांवर लाचखोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिस कर्मचारीच लाच घेत असल्याने राज्याच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे गुन्हेगार सहजपणे गोव्यात प्रवेश करून बाहेरही निसटत असल्याचा दावा काँग्रेसने केला. राज्यातील नागरिक, महिला आणि पालकांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. काही वर्षांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांचा दरोडेखोरांना मदत केल्याचा प्रकार तसेच एका अंडरट्रायल आरोपीला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत अशा घटनांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे ते म्हणाले.

मोरजी येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये बेकायदा डोंगर कापणीला विरोध करणारे उमाकांत खोत यांच्या हत्येचा उल्लेख करत, या घटनेमुळे राज्यातील जनतेत असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाल्याचे चोडणकर यांनी सांगितले. तसेच, गोव्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असतानाही पोलिसांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचता येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गेल्या चार वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी देत सरकारवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत १२७ खून, ३८३ बलात्कार, २,११३ चोरी, घरफोडी व दरोड्यांचे गुन्हे, ३५४ अपहरण आणि १,१२७ मारहाणीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. ही आकडेवारी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले.

माजी महाराष्ट्र गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांनीही वाढत्या गुन्हेगारीवरून भाजप सरकारवर निशाणा साधला. गुन्हेगारी वाढत असताना नागरिकांनी सुरक्षित वाटावे कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat