Dailyhunt
सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा प्रवास होणार सुसाट; कल्याण-माळशेज महामार्ग कात टाकणार

सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा प्रवास होणार सुसाट; कल्याण-माळशेज महामार्ग कात टाकणार

Malshej Ghat

मुंबई (Mumbai): पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासाठी आणि कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा मानला जाणारा कल्याण-मुरबाड-माळशेज घाट मार्ग लवकरच कात टाकणार आहे.

निसर्गाच्या कुशीतून, उंच डोंगराळ भागातून आणि अवघड वळणांवरून जाणारा हा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता कंबर कसली असून, या महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे.

समृद्धी महामार्गालगत 12 ड्रायपोर्ट उभारण्याची सरकारची तयारी

कल्याण मुरबाड निर्मल या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ठवर सध्या विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. हा संपूर्ण मार्ग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे.

एका बाजूला उंच डोंगरकडा, दुसरीकडे खोल दरी आणि जोडीला नागमोडी वळणे अशा खडतर परिस्थितीत रस्ता रुंदीकरणाचे काम करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान होते. मात्र, प्रवाशांची सुरक्षा आणि वाढती वाहतूक लक्षात घेता, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या आव्हानावर मात करत कामाचा धडाका लावला आहे. कामादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Nashik: बिबटे रोखण्यासाठी प्लॅन तयार; 16 कोटींचा आराखडा; डीपीसीतून देणार 1 कोटी

सध्या या महामार्गावर दोन टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण यावर मुख्य भर दिला जात आहे. विशेषतः कल्याणनजीकच्या पंधरा ते अडतीस किलोमीटर अंतरामध्ये चौपदरीकरणाचे काम सुरू असून, पुढे घाटमाथ्याकडे जाणाऱ्या अठावन्न ते चौऱ्याऐंशी किलोमीटर टप्प्यात दुपदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

यातील दिलासादायक बाब म्हणजे, रायते ते गोवेली हा भाग वगळता पंधरा किलोमीटरच्या पट्ट्यातील चौपदरीकरण आणि घाटाकडील सुमारे पाच किलोमीटरचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी खुले देखील करण्यात आले आहे.

Nashik: मंत्री कोकोटेंनी सूचवलेल्या रस्त्यासाठी खासदार वाजेंनी आणला केंद्राचा निधी

सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाच्या दर्जाबाबत आणि वेळेबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहतुकीयोग्य स्थितीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करण्यात आली आहे. कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना कार्यकारी अभियंता कार्यालयाने दिल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांचा खोळंबा होणार नाही.

घाटातील चढ-उतार आणि निसर्गाचे रौद्र रूप यांचा समतोल साधत सुरू असलेले हे काम पूर्ण झाल्यानंतर, कल्याण ते नगर हा प्रवास वेगवान तसेच सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama