अमित शाह यांची घोषणा
देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालून भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने कालमर्यादा निश्चित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत देशातून अंमली पदार्थांचा धोका संपवण्याचे लक्ष्य जाहीर केले.
या मोहिमेसाठी देशभरातील पोलिस दलांनी समन्वयाने आणि पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. अंमली पदार्थांची समस्या ही केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक भवितव्यापुढील गंभीर आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे, पोलीस यंत्रणा तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येते. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून देशविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांना आर्थिक मदत मिळण्याचा धोका असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. त्यामुळे या समस्येकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील तीन वर्षांत अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या नेटवर्कवर निर्णायक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ठोस कृती आराखड्यानुसार काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या संकल्पनेला अनुसरून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले
भारत-अमेरिका कराराच्या वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरूच; शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा!
मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!
'ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू'
पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
या कार्यक्रमात अमित शाह यांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्यानंतर देशभरात ३६ हजार ८५२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना बलिदान दिले असून, यंदा १५४ पोलीस कर्मचारी हुतात्मा झाल्याची माहिती त्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाची भरपाई कोणत्याही प्रकारे होऊ शकत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

