Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८० वर्षांनंतर न्याय! ९,९०९ हुतात्मा सैनिकांची नावे अधिकृत यादीत

८० वर्षांनंतर न्याय! ९,९०९ हुतात्मा सैनिकांची नावे अधिकृत यादीत

NEWS डंका 2 weeks ago

हिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना मिळाला सन्मान

पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यासाठी लढताना प्राणांची आहुती देणाऱ्या हजारो भारतीय सैनिकांना तब्बल आठ दशकांनंतर अधिकृत मान्यता मिळाली आहे.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन (CWGC) ने आपल्या अधिकृत युद्धातील मृत सैनिकांच्या नोंदींमध्ये ९,९०९ ब्रिटिश भारतीय सैनिकांची नावे नव्याने समाविष्ट केली आहेत. राष्ट्रकुलाच्या युद्धातील हानीच्या नोंदींमध्ये गेल्या ८० वर्षांतील हे सर्वात मोठे अद्यतन मानले जात आहे. इतिहासकार, संशोधक आणि स्वयंसेवकांनी अनेक वर्षे केलेल्या संशोधनानंतर ही महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात आली असून, यामुळे इतिहासाच्या पानांवरून जवळपास विस्मृतीत गेलेल्या हजारो भारतीय सैनिकांना अखेर योग्य सन्मान मिळाला आहे.

अहवालानुसार, नव्याने नोंद करण्यात आलेल्या बहुतांश सैनिकांचा संबंध तत्कालीन ब्रिटिश भारतातील अविभाजित पंजाब प्रांताशी होता. १९४७ च्या फाळणीनंतर हा प्रदेश भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला. या सैनिकांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या वतीने विविध रणांगणांवर लढा दिला होता. मात्र, विविध प्रशासकीय कारणांमुळे आणि तत्कालीन धोरणांमुळे त्यांची नावे अधिकृत युद्ध नोंदींमध्ये समाविष्ट झाली नव्हती. या ऐतिहासिक दुरुस्तीमागे पाकिस्तानातील लाहोर संग्रहालयात जतन करून ठेवलेल्या जुन्या लष्करी नोंदींचा मोठा वाटा आहे. या हस्तलिखित नोंदवह्यांचे डिजिटायझेशन करून संशोधकांनी त्यांचा बारकाईने अभ्यास केला.

युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश भारतीय अधिकाऱ्यांनी पंजाबमधील गावोगावी जाऊन सुमारे ३ लाख २० हजार सैनिकांच्या सेवाविषयी आणि त्यांच्या भवितव्याविषयी माहिती संकलित केली होती. मात्र, कालांतराने या नोंदी दुर्लक्षित राहिल्या. आता त्या पुन्हा समोर आल्याने हजारो सैनिकांची ओळख अधिकृतपणे पुनर्स्थापित झाली आहे. हा प्रकल्प ब्रिटनमधील पंजाब हेरिटेज असोसिएशन या संस्थेने हाती घेतला होता. संस्थेच्या सदस्यांनी इतिहास संशोधकांसह जुन्या हस्तलिखित नोंदवह्यांचा अभ्यास करून अनेक सैनिकांची नावे शोधून काढली. या संशोधनात ग्रीनविच विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थिनी जस्मिन बसरा यांचाही सहभाग होता. संशोधनादरम्यान त्यांना त्यांच्या स्वतःच्या पणजोबांचे आणि त्यांच्या भावाचे नाव या नोंदींमध्ये आढळले. जस्मिन यांनी सांगितले की, या शोधामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या इतिहासाशी नव्याने नाते जोडता आले आणि पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाची जाणीव अधिक तीव्र झाली.

या अद्ययावत नोंदींमुळे अनेक कुटुंबांना दशकांनंतर आपल्या पूर्वजांविषयी अधिकृत माहिती मिळाली आहे. ब्रिटनमधील लेस्टर येथे राहणारे दंतवैद्य सनी पलाही यांनी सांगितले की, संशोधकांनी त्यांना त्यांच्या पणजोबा केसर सिंग यांचे नाव नव्या यादीत समाविष्ट झाल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अखेर आपल्या पूर्वजांच्या बलिदानाला अधिकृत मान्यता मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन आता नव्याने नोंद झालेल्या सैनिकांच्या वंशजांचा शोध घेण्याचे कामही करत आहे.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!

सॉफ्टवेअर कंपनी SAP ने भरती थांबवली; AI वर करणार लक्ष्य

'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्याने भारतीयांना ४,०५७ कोटींचा फटका

अमरनाथ यात्रा २०२६: तीन दिवसांत ५६ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशनच्या माहितीनुसार, नव्याने मान्यता मिळालेल्या ९,९०९ सैनिकांपैकी अनेकांचा मृत्यू युद्धभूमीवर नव्हे, तर जखमांमुळे इतर ठिकाणी झाला होता. त्या काळातील ब्रिटिश भारतीय सरकारच्या धोरणांमुळे अशा सैनिकांना अधिकृत युद्धातील मृतांच्या यादीत स्थान मिळाले नव्हते. आता आयोगाने ते धोरण रद्द करून या सैनिकांना युद्धातील शहीद म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशनने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय केवळ युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी नाही, तर पहिल्या महायुद्धाचा अधिक अचूक, न्याय्य आणि सर्वसमावेशक इतिहास जगासमोर मांडण्यासाठी महत्त्वाचा आहे. तब्बल ८० वर्षांनंतर झालेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो भारतीय सैनिकांच्या बलिदानाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली असून, इतिहासातील एक मोठी त्रुटी दुरुस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka