Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताचा चीनवर नहेले पे दहला

भारताचा चीनवर नहेले पे दहला

NEWS डंका 2 weeks ago

काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहेमान चीन भेटीवर गेले होते. यावेळी झालेल्या महत्वपूर्ण करारात विकासाच्या नावाखाली मंगोला बंदर बांगलादेशने चीनला बहाल करण्यात आले. हा उघड उघड भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न होता.

भारताच्या परसदारात चीनला आणून बसवणारे अनेक करार बांगलादेशने रहेमान यांच्या दौऱ्या दरम्यान करण्यात आले आहेत. भारतासमोर बांगलादेशची ताकद तोळामासा आहे. खरे आव्हान चीनचे आहे. ताज्या इंडोनेशिया भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला 'नहले पे दहला' दिला आहे. इंडोनेशियाचे साबांग बंदर आता भारत विकसित करणार आहे. मलाक्का सामुद्रधनीत अत्यंत मोक्याच्या बिंदूवर हे बंदर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याला प्रचंड मोठा 'चीन संदर्भ' आहे. ६ ते ८ जुलै असा मोदींचा दौरा आहे. इंडोनेशियाचे पंतप्रधान प्रभावो सुबिआंतो यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. इंडोनेशिया हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सगळ्या मोठा मुस्लीम देश. एका बाजूला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चीनच्या मांडीवर बसलेला असताना इंडोनेशिया मात्र भारताच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. चीनच्या दादागिरीने या दोन्ही देशांना घट्ट मित्र बनवले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती दादागिरी आणि हिंदी महासागरात पाय पसरवण्याची धडपड या पार्श्वभूमीवर भारत आणि इंडोनेशिया हे दोन मोठे लोकशाही देश एकत्र येत आहेत. अलिकडेच चीनच्या कडवट विरोधक मानल्या जाणाऱ्या जपानच्या पंतप्रधान साने ताकाईचि भारतात येऊन गेल्या. चीनला यामुळे प्रचंड मिर्च्या झोंबल्या. इंडोनेशिया भारताच्या जवळ आल्यामुळे चीन अधिकच धुमसणार आहे.

चीनला भारत जशास तसे उत्तर देतो आहे. भारताने यापूर्वी चीनचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या 'फिलिपिन्स'ला ब्रह्मोस दिले आहे. आता इंडोनेशियासोबतही ब्रह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्राबाबत करार झाला आहे. दक्षिण चीन समुद्रात एक 'ब्रह्मोसची भिंत' तयार करण्याचे काम भारताने सुरू केला आहे. आग्नेय आशियातील अनेक देश भारताशी मैत्री करण्यास उत्सुक आहेत. त्यांनाही ब्रह्मोस हवे आहे.

'थाला'चा जलवा थेट फिफापर्यंत

नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

अफवांना सूर्यकुमारचा सणसणीत षटकार!

ओपेकचा मोठा निर्णय; तेलाचे दर कोसळण्याची चिन्हे!

'मलाक्का सामुद्रधनी' हा चीनसाठी अत्यंत संवेदनशील मार्ग आहे. चीनची ८०% तेलाची आयात याच अरुंद समुद्र मार्गातून होते. मलक्कावर भारताची पूर्ण पकड आहे. इंडोनेशियाच्या मदतीने ती अधिक मजबूत होणार आहे. मलक्काचे त्रांगडे सोडवण्यासाठी चीनने जो चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअर बनवला होता, तो बलोच योद्ध्यांमुळे पूर्ण बोंबलला आहे. चायना म्यानमार इकोनॉमिक कोरीडोअर म्यानमारमधील अंतर्गत बंडाळीमुळे निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे आज तरी मलाक्का शिवाय चीनकडे पर्याय नाही.

साबांग बंदराच्या विकासामुळे भारत आणि इंडोनेशिया मिळून या मार्गावर पूर्णपणे पाळत ठेवू शकतात. मलाक्काच्या सामुद्रधनीतून बंगालच्या उपसागरात बाहेर पडले की समोर अंदमान निकोबार आहे आणि या सामुद्रधनीत आता साबांगचा नवा तळ तयार होतो आहे. युद्धाच्या प्रसंगी चीनची कोंडी करण्यासाठी हा भारताचा सर्वात मोठा हुकमी एक्का बनू शकतो. हा तळ मलाक्कामधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक चीनी जहाजाच्या हालचालींवर पाळत ठेवण्याची सुविधा भारताला देणार आहे.

भारत आणि चीनची भूमी एकमेकांना लागून आहे. इंडोनेशियालाही चीनचा समुद्री शेजार लाभलेला आहे. चीनचे हे दोन्ही शेजारी समदु:खी आहेत. मोदी आणि सुबिआंतो या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत भारताचे अंदमान-निकोबार बेट आणि इंडोनेशियाचे 'साबांग बंदर' यांच्यातील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला आहे. चीनचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजेच 'हाइनान बेट', इथून साबांग बंदराचे अंतर सुमारे २,४०० किलोमीटर आहे. चीनने 'दक्षिण चीन समुद्रात' तयार केलेली कृत्रिम बेटे आणि लष्करी तळांमुळे हे अंतर १,५०० ते १,८०० किलोमीटर अंतरावर आले आहे.

चीन सध्या दक्षिण चीन समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर आपला एकतर्फी ताबा सांगतो आणि व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशियाच्या जहाजांना धमकावण्याचे काम करतो. भारत आणि इंडोनेशियाने एकत्र येऊन घेतलेली ही भूमिका म्हणजे चीनच्या विस्तारवादी धोरणाला थेट राजनैतिक आव्हान आहे.

सध्याच्या जागतिक परिस्थितीत अमेरिकेचे आशिया-पॅसिफिक क्षेत्रावरील लक्ष थोडे विचलित झाले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातील धरसोड वृत्तीमुळे कधी काळी अमेरिकेवर विसंबून असलेले देश त्रस्त आहत. अशा वेळी आशियातील देशांना चीनच्या दडपणाखाली एकटे पडू न देण्याचे काम भारत करतो आहे. भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश अमेरिकेवर अवलंबून न राहाता. स्वतःच प्रादेशिक सुरक्षेचे 'सह-शिल्पकार' बनत आहेत. नरेंद्र मोदींचा हा इंडोनेशिया दौरा केवळ व्यापारी संवाद नाही, तर चीनच्या वाढत्या वर्चस्वाला अटकाव करण्यासाठी भारताने आखलेल्या 'अॅक्ट ईस्ट' आणि 'महासागर' धोरणाची ताजी झलक आहे.

चीन गेल्या अनेक वर्षांपासून भारताला समुद्रातून वेढण्यासाठी 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' ही रणनीती राबवत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून चीनने बांगलादेशमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या 'मोंगला बंदराच्या' आधुनिकिकरणाचे आणि विस्ताराचे कंत्राट मिळवले आहे. हे बंदर भारताच्या पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांच्या अगदी जवळ आहे. इथून चीनला भारतात झाकणे शक्य होणार आहे.

भविष्यात दुरुस्ती किंवा रसदीच्या बहाण्याने चीन आपल्या युद्धनौका आणि पाणबुड्या भारताच्या अगदी जवळ असलेल्या या बंदरात तैनात करू शकतो, ज्यामुळे भारताच्या पूर्व समुद्री सीमेवर ताण येऊ शकतो. भारताने चीन-बांगलादेशच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी अजिबात वेळ दवडला नाही. तातडीने साबांग ताब्यात घेऊन टाकले. सुमात्रा बेटाच्या उत्तरेला असलेले अत्यंत संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे 'साबांग बंदर' विकसित करण्याची आणि वापरण्याची परवानगी इंडोनेशियाने भारताला दिली आहे. भारताचे अंदमान-निकोबार आणि इंडोनेशियाचे साबांग बंदर एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. जर उद्या चीनने भारतासोबत युद्ध किंवा कुरापत काढली, तर भारत साबांग बंदरावरून चीनची संपूर्ण कोंडी करून चीनचा तेलपुरवठा रोखू शकतो.

मोदींच्या दौऱ्या निमित्त दोन्ही देशांमध्ये जे करार झाले त्यात निकेल खाणींबाबतही चर्चा झाली. इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठा निकेलचा साठा आहे, जो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या इंडोनेशियाच्या निखेल उद्योगात चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आणि मक्तेदारी आहे. भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. इंडोनेशियालाही चीनवर संपूर्णपणे अवलंबून न राहता आपल्या बाजारपेठेचा विस्तार करायचा आहे. दोन्ही देशांच्या गरजा एकमेकांना व्यवस्थित जुळताना दिसतायत.

चीनने बांगलादेशची निवड केली. या देशाचा जीडीपी सुमारे ५१९ अब्ज डॉलर इतका आहे. भारताने इंडोनेशियाची निवड केली. या देशाचा जीडीपी १.५४ ट्रिलियन डॉलर आहे. इंडोनेशियाचा जागतिक अर्थव्यवस्थेत १७ वा क्रमांक आहे. बांगलादेशचा क्रमांक ३५ वा आहे. भारताकडे इंडोनेशियाला देण्यासारखे बरेच आहे. भारत शस्त्रास्त्र उत्पादक देशांच्या श्रेणीत आपले स्थान बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. हे स्थान मजबूत करण्यासाठी चीनचा आपल्याला दुहेरी उपयोग होतो आहे. एक तर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर चीन निर्मिती शस्त्र आणि उपकरणे किती सुमार दर्जाची आहेत, हे पाकिस्तानने सिद्ध केलेले आहे. भारताची शस्त्र किती दमदार हेही सिद्ध झाले आहे. दुसऱ्या बाजूला चीनने दक्षिण चीन समुद्रात इतक्या देशांना धमकावले आहे की हे देश शस्त्रांसाठी भारताकडे आशेने पाहात आहेत. भारत त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो आहे. त्यांना सुरक्षा मिळते आहे, भारताला बाजारपेठ. त्यामुळे भारताने खरे तर चीनचे आभारच मानले पाहीजेत. चीनसारखा खलनायक नसता, तर भारताला हिरो बनण्याची संधीच मिळाली नसती.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka