एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त गुजरातच्या वडनगरमध्ये 'सेवा संकल्प अभियान' आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गुजराती भाषेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात प्रसिद्ध असल्याचे सांगताना त्यांनी गुजरातीमध्ये दोन ओळी म्हणत भाषण सुरू केले.
ब्रिटन दौऱ्यात इंग्रजी भाषणामुळे चर्चेत आलेले एकनाथ शिंदे आता गुजरातमध्ये चक्क गुजराती भाषेत बोलताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच गुजरातीमधून केली. 'वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे. आज आ धरती ऊपर आवीने गर्व अनुभवूं छूं,' या गुजराती ओळींनी त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे ब्रिटनमध्ये इंग्रजी आणि आता वडनगरमध्ये गुजराती, अशा वेगवेगळ्या भाषांमधून शिंदे यांनी संवाद साधल्याची चर्चा रंगली आहे. भाषणाची सुरुवात गुजरातीमध्ये होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे कौतुक केले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने आणि साडेबारा कोटी जनतेच्या तसेच शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या बाबतीत वयाचे आकडे मोजत नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीला मोजतो. पंतप्रधान मोदींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होते आणि जनतेप्रति त्यांचे कार्य अरबी समुद्राच्या खोलीने मोजले जाऊ शकते. वडनगरच्या मातीतून एका लहान बालकाचा आवाज घुमला, तो केवळ गुजरातमध्ये किंवा देशातच नाही, तर परदेशातही आज घुमतोय; ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणूनच वडनगर ते वाराणसी ही ऐतिहासिक सेवा यात्रा केवळ एक प्रवास नसून ही सेवेकडून समर्पणाकडे जाणारी एक अद्भुत यात्रा आहे. २५ वर्षांत त्यांची पदे बदलत गेली, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे सेवेचा संकल्प.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा देशाचा पंतप्रधान बदलतो, तेव्हा फक्त सरकार बदलत नाही, तर देशाचे भविष्य बदलते; तोच करिष्मा २०१४ नंतर पाहिला. एक गरीब आई जिच्या घरात गॅसची शेगडी पेटली, एक कुटुंब ज्याला आपले पक्के घर मिळाले, एक व्यक्ती ज्याचे पहिल्यांदा बँक खाते उघडले आणि एक कुटुंब ज्याच्या घरात नळाने पाणी पोहोचले; अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचे काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, हाच जनसेवेचा वास्तविक अर्थ आहे.
युपीआय चालवणे स्वस्त नाही; राहुल गांधींच्या विरोधात ओमर अब्दुल्लांची भूमिका
अमेरिकेच्या निर्बंध विधेयकानंतर भारत ऊर्जा सुरक्षा, आर्थिक हितांवर ठाम
'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची झेप!
अतिककडून जप्त केलेल्या जमिनीवरील घरात मोदींचा थाटात वाढदिवस
पंतप्रधान मोदींच्या काळात आज देश प्रगती करत आहे आणि देश नव्या उंचीच्या शिखरावर पोहोचत आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे, पण आपण दहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आलो आहोत आणि तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा संकल्प आहे. ३७० कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनात हटवून, काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे हे दाखवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या सुरक्षेची गोष्ट येते, तेव्हा भारत शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून मारण्याची क्षमता ठेवतो, हेच नरेंद्र मोदी आणि आपल्या सैन्याने दाखवून दिले आहे; हा नवा भारत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

