गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई
कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या नावाने एका विकासकाकडे तब्बल ११ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना रंगेहाथ अटक केली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील एका पुनर्विकास प्रकल्पातील विकासकाला छोटा राजन गँगच्या नावाने धमकावून ११ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती आरोपींनी पहिल्या हप्त्यापोटी २५ लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या विकासकाने तातडीने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीची गंभीर दखल घेत खंडणी विरोधी पथकाने आरोपींना पकडण्यासाठी एक धाडसी सापळा रचला. पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या रोख रकमेऐवजी एका बॅगेत 'चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया'च्या बनावट नोटांचे ५० बंडल भरले. बॅग पूर्णपणे खऱ्या नोटांनी भरलेली दिसावी यासाठी पोलिसांनी बंडलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला खऱ्या ५०० रुपयांच्या नोटा लावून हुबेहूब देखावा तयार केला.
प्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जाणार? याचिका न्यायालयाने फेटाळली
राम मंदिराच्या सीईओपदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
ठरल्याप्रमाणे आरोपी २५ लाख रुपयांची पहिली रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता, दबा धरून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने त्यांना बॅग ताब्यात घेताच रंगेहाथ बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी डॅनियल स्टीव्हन, एथेल स्टीव्हन, नझीर शेख, अब्दुल्ला खान आणि रेमी फर्नांडिस या पाच जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
आरोपींनी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी छोटा राजनच्या नावाचा वापर केला होता की त्यांचे प्रत्यक्षात अंडरवर्ल्डशी काही संबंध आहेत, या दिशेने पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

