काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना शस्त्रे, आर्थिक मदत केल्याचा आरोप
जम्मूतील विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) न्यायालयाने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याच्याविरोधात नवे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रे, आर्थिक मदत आणि निर्देश दिल्याचा आरोप सईदवर आहे. जम्मू एनआयए न्यायालयाने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सईदविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जम्मू एनआयएचे डीआयजी यांच्याकडे पाठवण्यात आले असून, कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर मदत पुरवल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान हे वॉरंट जारी करण्यात आले. यापूर्वी जुलै महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भातही सईदविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. या प्रकरणात एनआयएने सईदला हल्ल्याच्या कथित सूत्रधारांपैकी एक असल्याचे म्हटले होते. एनआयएने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, सईद काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रे, पैसे आणि निर्देश पुरवत आहे. सईद सध्या पाकिस्तानमध्ये असून, कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी तो जाणूनबुजून अटकेपासून दूर राहत असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.
गणेशोत्सवात कोकणवारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तीन मेमू धावणार
'ब्रिक्स'मध्ये प्रवेशासाठी पाकिस्तानची तीन वर्षांपासून धडपड
सहा वर्षांनंतर ग्वांगझोऊ-नवी दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार
मोदींचा ब्रिक्समधील 'तो' फोटो सांगतोय भारताची कूटनीती!
न्यायालयाने म्हटले की, आरोपी फरार असून तपास यंत्रणेला त्याला सामान्य प्रक्रियेद्वारे न्यायालयासमोर हजर करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एनआयएचा अर्ज मंजूर करत त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. हाफिज मोहम्मद सईदला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत घोषित दहशतवादी ठरवण्यात आले आहे. तो प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक असून, पाकिस्तानातून कारवाया करत असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

