Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसआयआर नसलेल्या भागांत फॉर्म-६वरील अतिरिक्त प्रश्न हटवले

एसआयआर नसलेल्या भागांत फॉर्म-६वरील अतिरिक्त प्रश्न हटवले

NEWS डंका 3 weeks ago

नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया होणार सोपी

नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-६ बाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. ज्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआरची प्रक्रिया सुरू नाही किंवा ती पूर्ण झाली आहे, अशा ठिकाणी फॉर्म-६सोबत विचारले जाणारे एसआयआरशी संबंधित अतिरिक्त प्रश्न आणि घोषणापत्र आता वगळण्यात आले आहे.

त्यामुळे अशा भागांतील नवीन मतदारांना स्वतःचे किंवा आई-वडील अथवा आजी-आजोबांचे मागील एसआयआरमधील मतदार यादीशी असलेले संबंध दर्शविण्याची अतिरिक्त माहिती देण्याची गरज राहणार नाही.

यापूर्वी एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान नवीन मतदारांकडून फॉर्म-६सोबत स्वतंत्र घोषणापत्र घेतले जात होते. या घोषणापत्रात अर्जदाराने स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईकांचे मागील एसआयआरच्या मतदार यादीतील तपशील देणे अपेक्षित होते. त्यामध्ये संबंधित मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच पालक किंवा जोडीदाराच्या मतदार ओळखपत्राशी संबंधित माहितीचा समावेश होता. मात्र, एसआयआरची प्रक्रिया सुरू नसलेल्या भागांत अशा माहितीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अतिरिक्त घोषणापत्राची अट हटवली आहे.

उमर खालिद, शरजील इमामचा जामीन पुन्हा फेटाळला

८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये
या निर्णयामुळे नवीन मतदारांसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. आता एसआयआर सुरू नसलेल्या किंवा प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये अर्जदारांना नोंदणीकृत नियमांनुसार असलेला नियमित फॉर्म-६ भरावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने संबंधित अतिरिक्त घोषणा ईसीआयनेट पोर्टल, अॅप तसेच संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवरूनही हटवली आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदानाचा हक्क मिळवणाऱ्या नागरिकांना जुन्या मतदार यादीतील नोंदी शोधण्याची किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मागील एसआयआरशी संबंधित माहिती देण्याची अतिरिक्त प्रक्रिया टळणार आहे.

मात्र, ज्या राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, तेथे ही अतिरिक्त घोषणा लागू राहणार आहे. म्हणजेच हा बदल देशभरातील सर्व भागांसाठी एकसारखा नसून एसआयआरच्या स्थितीनुसार लागू केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबरच्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते की एसआयआरच्या कालावधीत अतिरिक्त घोषणा आवश्यक राहील, तर एसआयआर नसलेल्या कालावधीत नियमित फॉर्म-६ वापरला जाईल. त्यामुळे मतदार नोंदणीची प्रक्रिया एसआयआरच्या स्थितीनुसार वेगवेगळी राहणार असली, तरी एसआयआर नसलेल्या भागातील नवीन मतदारांना आता अतिरिक्त प्रश्नांपासून दिलासा मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka