Dailyhunt
हद्दपार करूनही परत येतायत बांगलादेशी

हद्दपार करूनही परत येतायत बांगलादेशी

NEWS डंका 2 months ago

मुंबई पोलिसांसमोर नवे आव्हान

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. जेमतेम सहा महिन्यांपूर्वी मीरा-भाईंदरमधून हद्दपार करण्यात आलेल्या ४६ वर्षीय राबिया नासिर मुल्लाला अलीकडेच विलेपार्ले परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

तिला पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राबियाप्रमाणेच दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आलेल्या झुलेखा जमाल शेख (३८) आणि बिल्किस बेगम सिरमिया अख्तर (३०) यांनीही गेल्या ऑगस्टमध्ये हद्दपार करण्यात आल्यानंतर बेकायदेशीर मार्गाने भारतात परतल्याची कबुली दिली. मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २५ वर्षांपासून घरकाम करत वास्तव्यास असलेल्या राबियाने जंगलातून सीमा ओलांडून परत आल्याचे पोलिसांना सांगितले.

बेकायदेशीर स्थलांतरितांचे असे परतणे हे मुंबई पोलिसांसाठी चिंतेचे ठरत आहे. पश्चिम बंगाल सीमेवरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही निर्वासितांनी सीमा सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाच देऊन परत आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांत राज्यभरात १,२३७ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाढत्या कारवाईमुळे केवळ मुंबई महानगर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात अटक आणि हद्दपारीची संख्या वाढली आहे.
सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, मुंबईतील ९३ पोलिस ठाण्यांना बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. '२०२५ मध्ये १,००० हून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले. २०२६ मध्ये पकडलेल्या शेकडो जणांची हद्दपारी प्रक्रिया सुरू आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकन विमानवाहू नौकेतच मूलभूत सुविधांचा बोजवारा

केरळचे नाव बदलून 'केरळम'!

शेअर बाजारात भीषण घसरण

२०२८ पर्यंत भारताला मिळणार पहिले स्वदेशी मरीन इंजिन!

८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली.

दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी अंधेरी (पश्चिम) परिसरातून १८ ट्रान्सजेंडरसह २१ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. संबंधित सर्व प्रकरणांचा अहवाल मुंबईतील परदेशी नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, त्यांना लवकरात लवकर हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्यातही गेल्या वर्षी हद्दपार झालेल्या दोन महिलांना दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडियाजवळून झुलेखा शेखला, तर कफ परेड परिसरातून बिल्किस अख्तरला ताब्यात घेण्यात आले. हद्दपारीनंतरही पुन्हा शहरात प्रवेश करणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, सीमासुरक्षेबाबत अधिक कडक उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka