१०५ अमेरिकन खासदारांचे एफबीआयला पत्र
अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची संभाव्य द्वेषपूर्ण गुन्हा म्हणजेच 'हेट क्राइम' म्हणून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील १०५ खासदारांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक काश पटेल यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांसह हिंदू आणि दक्षिण आशियाई समुदायांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन धमक्यांबाबतही या खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील अरोरा शहरातील श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) हिंदू मंदिराबाहेर ११ ऑक्टोबर रोजी गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिस याला अटक करण्यात आली आहे. संशयिताने मंदिराबाहेर एका व्यक्तीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या रायफलमध्ये बिघाड झाल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने पुन्हा घटनास्थळी परतण्याची योजना आखल्याचेही तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयिताच्या निवासस्थानी झडती घेतली असता रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, बॉडी आर्मर आणि श्वेत वर्चस्ववादी विचारसरणीशी संबंधित चिन्हे आढळल्याचे वृत्त आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हिंसक विचारांचा उल्लेख असलेला कथित जाहीरनामाही तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपांची चौकशी सुरू आहे.
राजा कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली १०५ खासदारांनी २० ऑक्टोबर रोजी एफबीआय संचालक काश पटेल यांना पत्र पाठवले. या प्रकरणात वांशिक, वंशीय आणि धार्मिक द्वेषातून गुन्हा करण्याचा हेतू होता का, याची स्पष्टपणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऑनलाइन माध्यमांद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या का, या कथित कटात इतर व्यक्तींचा सहभाग होता का आणि अशा धमक्या रोखण्यासाठी एफबीआय कोणती पावले उचलत आहे, याबाबतही खासदारांनी माहिती मागवली आहे.
३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारत नशामुक्त करण्याचे लक्ष्य!
पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले
भारत-अमेरिका कराराच्या वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरूच; शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा!
मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!
या पत्रावर भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांसह विविध प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पूजा-अर्चनेसाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या धर्मामुळे, वंशामुळे किंवा मूळ देशामुळे हिंसाचाराच्या भीतीत जगावे लागू नये, असे खासदारांनी पत्रात नमूद केले आहे. धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यासोबतच संभाव्य धोक्यांची माहिती स्थानिक पोलिस आणि संबंधित समुदायांपर्यंत वेळेत पोहोचवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

