Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'लाल धातू'च्या दरात तुफान तेजी

'लाल धातू'च्या दरात तुफान तेजी

NEWS डंका 1 month ago

सोने-चांदीनंतर तांब्याचाही विक्रमी भाव

सोने आणि चांदीच्या दरवाढीने बाजाराचे लक्ष वेधून घेतले असतानाच आता तांब्याच्या किमतीनेही विक्रमी पातळी गाठली आहे. लंडन मेटल एक्स्चेंजमध्ये तांब्याचा दर १४ हजार ७०० डॉलर प्रति टनांच्या पुढे पोहोचला असून, तांब्याच्या या तेजीमागे वाढती औद्योगिक मागणी, मर्यादित पुरवठा आणि अमेरिकेच्या आयातशुल्काचे धोरण ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे.

तांब्याचा वापर केवळ पारंपरिक उद्योगांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इलेक्ट्रिक वाहनं, वीजवाहिन्या, अक्षय ऊर्जा प्रकल्प, डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी तांबे अत्यावश्यक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात तांब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

मल्ल्याच्या १५ हजार कोटींच्या वसुलीने प्रकरण संपणार नाही!

सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

दरम्यान, अमेरिकेकडून तांब्याच्या आयातीवर शुल्क लावण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारातील समीकरण आणखी बदलले आहे. संभाव्य शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेतील व्यापारी आणि कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर तांब्याची खरेदी करून साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील तांब्याचा साठा वाढत असताना इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध साठा तुलनेने कमी झाला आहे. मागणी कायम आणि उपलब्ध पुरवठा मर्यादित राहिल्याने तांब्याच्या किमतीवर चढता दबाव निर्माण झाला आहे. त्यातच जगातील प्रमुख तांब्याच्या खाणींमधून उत्पादन वाढवणे सहज शक्य नसल्याने पुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

तांब्याला अनेकदा 'लाल धातू' आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा 'थर्मामीटर' म्हटले जाते. कारण उद्योग, बांधकाम, वीज, वाहतूक आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र सध्याची दरवाढ ही केवळ अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत देत नाही. अमेरिकेचे संभाव्य शुल्क, बाजारातील साठेबाजी, पुरवठ्यातील अडचणी आणि एआय तसेच ऊर्जा संक्रमणामुळे वाढणारी मागणी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम तांब्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेच्या व्यापार धोरणाकडे आणि जागतिक तांबे पुरवठ्याकडे बाजाराचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka