Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू

NEWS डंका 2 weeks ago

धबधबे, दऱ्या आणि धोकादायक ठिकाणी प्रवेशावर बंदी

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत लोणावळा आणि परिसरात ३१ जुलैपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

या आदेशानुसार धबधबे, नद्या, धरण परिसर, खोल दऱ्या आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पावसाळ्यात लोणावळा, मावळ आणि आसपासच्या पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, गेल्या काही वर्षांत धबधब्यांमध्ये वाहून जाणे, दऱ्यांमध्ये पडणे, सेल्फी काढताना अपघात होणे आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कलम १६३ लागू केले आहे.

या आदेशानुसार वेगाने वाहणाऱ्या ओढे, नद्या किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. धबधब्यांच्या अगदी खाली बसणे, कड्यांच्या टोकावर जाऊन सेल्फी किंवा व्हिडिओ काढणे, धोकादायक ठिकाणी छायाचित्रण करणे, मद्यप्राशन करून पर्यटनस्थळांवर वावरणे तसेच बेदरकार वाहन चालवणे, धोकादायक ओव्हरटेक करणे आणि रस्त्याच्या कडेला वाहन उभी करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

तसेच धबधबे, धरणे आणि नदी परिसरात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मोठ्या आवाजात डीजे, साऊंड सिस्टीम किंवा वाहनांमधील वूफर वाजवणे, ध्वनी प्रदूषण करणे, महिलांशी गैरवर्तन करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे यावरही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आरजी कर प्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन कायम

कच्च्या तेलाच्या दरघसरणीने भारताला आर्थिक बूस्टर

८० वर्षांनंतर न्याय! ९,९०९ हुतात्मा सैनिकांची नावे अधिकृत यादीत

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचा परिणाम मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर झाला असून अनेक गाड्या रद्द किंवा वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना अत्यावश्यक कारणाशिवाय धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka