मार्कझ सुब्हान अल्लाहमध्ये बांधकाम सुरू असल्याचे उघड
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा (JeM) बहावलपूरमधील प्रमुख तळ पुन्हा उभारण्यात आल्याचे समोर आले आहे.
'मार्कझ सुभान अल्लाह' या जैशच्या मुख्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी करण्यात आली असून, ताज्या छायाचित्रांमध्ये इमारतीचे घुमट आणि इतर भाग पुन्हा उभारल्याचे दिसत आहे. 'ऑप इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले होते. बहावलपूरमधील मार्कझ सुभान अल्लाह हा या कारवाईतील महत्त्वाचा लक्ष्य होता. हल्ल्यानंतर या संकुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबातील १० जण आणि चार सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यामध्ये त्याची बहीण, तिचा पती, भाचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश असल्याचे त्याने म्हटले होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्ध्वस्त झालेल्या या तळाच्या पुनर्बांधणीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून निधी उभारणीचे प्रयत्न सुरू असल्याचे यापूर्वीही समोर आले होते. २०२६ मध्ये उपग्रह छायाचित्रांमध्ये या परिसरात जड यंत्रसामग्री आणि बांधकाम वाहने दिसून आली होती. आता ताज्या छायाचित्रांनुसार मुख्य सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि परिसरातील इतर भागांचीही डागडुजी करण्यात आल्याचे दिसते. मशिदीचे नुकसान झालेले घुमट पुन्हा उभारण्यात आले असून, भिंतींवर प्लास्टर, रंगकाम आणि संगमरवरी काम करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हुथींसमोर भारतीय नौदलाची 'ढाल'; जहाजाकडून बाब-अल-मंदेब पार
आता निवृत्तीनंतरही 'श्वान जवान' पोलिसांसोबतच राहणार
रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक
संभल हिंसाचारातील सूत्रधार शारिक सट्टाविरोधात रेड कॉर्नर नोटीस
बहावलपूरमधील मार्कझ सुब्हान अल्लाह हा जैश-ए-मोहम्मदचा वैचारिक आणि कार्यकारी केंद्र म्हणून दीर्घकाळ ओळखला जात असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणाचा वापर भरती, प्रशिक्षण आणि संघटनेच्या इतर कारवायांसाठी होत असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला तळ पुन्हा उभारला जाणे हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे.

