पोलिसाच्या वतीने पैसे घेणारा खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात
मुंबई : पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या वतीने पैसे स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
या प्रकरणात संजित कुमार याला अटक करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज ग्वामिनाथ धामगुंडे यांच्यासह त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या मुलीच्या पासपोर्ट प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर पडताळणीच्या कामासाठी धामगुंडे यांनी सुरुवातीला २ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, बोलण्यानंतर ही रक्कम १ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने वरळी येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.
संदेशखालीत ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तृणमूलच्या दोन महिला ताब्यात
सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण
मोदींच्या 'मेलोडी' गिफ्टचा गोड परिणाम
कारवाईदरम्यान धामगुंडे यांनी तक्रारदाराला जवळ उभ्या असलेल्या वाहनाजवळील कपाटात लाचेची रक्कम ठेवण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार संजित कुमार याने ती रक्कम स्वीकारून ठेवताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

