हॉकीपटू हरमनप्रीतने व्यक्त केली भावना
पुरुष एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ ही भारतीय संघासाठी विशेष संधी असणार आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान पंजाबमध्ये होणार असून, या माध्यमातून राज्यात आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन होणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने म्हटले आहे की, या स्पर्धेच्या निमित्ताने त्याचे वडील त्याला खेळताना थेट पाहू शकणार आहेत.
या सहा संघांच्या स्पर्धेत भारताचा सामना मलेशिया, दक्षिण कोरिया, चीन, जपान आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहे. स्पर्धेचे आयोजन जालंधर आणि मोहाली येथे करण्यात आले आहे. २०२३ मध्ये चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेनंतर भारत दुसऱ्यांदा पुरुष एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे.
या स्पर्धेला हरमनप्रीतसाठी विशेष महत्त्व आहे. भारतीय कर्णधाराला आपल्या राज्यात कुटुंबीयांसमोर आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची जर्सी घालून खेळण्याची संधी मिळणार आहे. हरमनप्रीत म्हणाला, 'संपूर्ण संघासाठी आणि विशेषतः पंजाबच्या खेळाडूंसाठी ही खूप खास संधी असेल. कारण पंजाबमध्ये भारताची जर्सी घालून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची आमची ही पहिलीच वेळ असेल.'
रशियन सैन्यात भर्ती झालेल्या २६७ पैकी ५१ भारतीयांचा मृत्यू
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये
व्यापार करार रखडला तरी भारत-अमेरिका संबंध मजबूत
भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेत दिसेल समावेशक तंत्रज्ञानाची ताकद
तो पुढे म्हणाला, 'मला आशा आहे की माझे संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित असेल आणि पहिल्यांदाच मला प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सामना खेळताना एकत्र पाहतील. यात माझे वडीलही असतील. त्यांनी मला कधीही स्टेडियममध्ये बसून देशासाठी खेळताना पाहिलेले नाही.'
हरमनप्रीत हा सलग दोन एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करणारा देशातील पहिला कर्णधार आहे.
पंजाबचा हॉकीशी ऐतिहासिक संबंध
या स्पर्धेमुळे भारतीय हॉकीमधील पंजाबच्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानावरही पुन्हा प्रकाश पडणार आहे. ग्रासरूट स्तरावरील हॉकी अकादमी आणि गावांमधील मैदानांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पंजाबने भारताला अनेक दिग्गज हॉकीपटू दिले आहेत. यामध्ये उधम सिंह, बलबीर सिंह सीनियर, मनप्रीत सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांचा समावेश आहे.
विशेषतः जालंधरचा हॉकीच्या इतिहासाशी अतिशय जवळचा संबंध आहे. संसारपूर आणि मिठापूरसारख्या भागांमध्ये अनेक पिढ्यांपासून हॉकी खेळणाऱ्या समुदायांनी प्रतिभावान खेळाडू घडवले आहेत.
बर्ल्टन पार्क येथील ऑलिम्पियन सुरजीत सिंह हॉकी स्टेडियममध्ये २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान उद्घाटन समारंभ आणि लीग टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर स्पर्धा मोहालीतील ऑलिम्पियन बलबीर सिंह सीनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियममध्ये दाखल होईल. येथे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरी आणि पदकांचे सामने खेळवले जातील.
भारतासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान
भारत या स्पर्धेत गतविजेता आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून उतरणार आहे.भारताने आतापर्यंत २०११, २०१६, २०१८ (संयुक्त विजेता), २०२३ आणि २०२४ मध्ये एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.

