कोटद्वारमध्ये दुकानदाराला धमकी दिल्याचा आरोप
उत्तराखंडमधील कोटद्वारमध्ये 'मोहम्मद दीपक' या नावाने चर्चेत आलेला दीपक कुमार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणामुळे कोटद्वारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला.
माहितीनुसार, गंगादत्त जोशी मार्गावरील कपड्यांच्या दुकानाचे मालक संजीव टांक यांनी दीपकविरोधात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावरील एका कमेंटवरून दोघांमध्ये वाद झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर दीपक दुकानात पोहोचला आणि त्याने व्यापाऱ्याला शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करताना पोलिसांनी आणखी काही कलमे जोडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात व्यापाऱ्याला धमकी दिल्याचे पुरावे आढळले. त्यानंतर शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन दीपकला प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक करण्यात आली.
उज्जैनमधील मशिदीशी संबंधित वादावर दीपकने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टवर संजीव टांक यांनी कमेंट केल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर दीपक दुकानात आल्याचा आणि व्यापाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर व्यापारी संघटनेने पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत कारवाईची मागणी केली.
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार
फ्लायदुबई हल्ल्यात इराणचा संबंध असल्यास…
तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी
भारत-फ्रान्स सागरी सराव 'वरुण'ला सुरुवात
'मोहम्मद दीपक' नावाने कसा चर्चेत आला?
दीपक कुमार जानेवारी २०२६मध्ये कोटद्वारमधील एका दुकानाच्या नावावरून झालेल्या वादानंतर चर्चेत आला होता. एका मुस्लिम दुकानदाराच्या दुकानाच्या नावातील 'बाबा' शब्दावरून काही जणांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दीपकने हस्तक्षेप केला आणि आपले नाव 'मोहम्मद दीपक' असल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दीपकची भेट घेत त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर 'मोहम्मद दीपक' हे नाव देशभरात चर्चेत आले.

