डोरीमलच्या जंगलात सुरक्षा दलांचा तिसऱ्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली असून डोरीमल आणि गांभीर मुघला परिसरातील दाट जंगलात तिसऱ्या दिवशीही जोरदार सर्च ऑपरेशन सुरू आहे.
भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी संपूर्ण भागाला वेढा घालत संशयित दहशतवाद्यांचा शोध अधिक तीव्र केला आहे. गुप्तचर यंत्रणांना या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई सुरू केली.
शनिवारी शोधमोहीम सुरू असताना जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही तात्काळ प्रत्युत्तर देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काही वेळ दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक सुरू होती. मात्र दाट जंगल आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत दहशतवादी आतल्या भागात पसार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी अतिरिक्त फौज मागवत संपूर्ण परिसर सील केला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू ठेवली.
SEBIचा नवा प्रस्ताव; ऑप्शन्स ट्रेडिंगचे नियम बदलणार
मुंबईत एमडी ड्रग्जची मोठी प्रयोगशाळा उद्ध्वस्त
चीनमधील एआय अभियंते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत
या ऑपरेशनमध्ये ड्रोन, अत्याधुनिक नजर ठेवणारी उपकरणे आणि विशेष कमांडो पथकांची मदत घेतली जात आहे. प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून जंगलातील प्रत्येक मार्गावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी पाकिस्तान समर्थित संघटनांशी संबंधित असण्याची शक्यता असून ते मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
राजौरी आणि आसपासच्या संवेदनशील भागात अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना जंगल परिसरात न जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सीमावर्ती भागात संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवली जात आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यानंतर सुरक्षा दलांनी अँटी-टेरर ऑपरेशन्स अधिक आक्रमक केले आहेत.
डोरीमल परिसरातील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण भागात तणावपूर्ण शांतता असून सुरक्षा दल कोणतीही जोखीम न घेता काळजीपूर्वक मोहीम राबवत आहेत.

