Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सत्तापालट ?  नव्हे, हे तर बंगाल चे सांस्कृतिक पुनर्जागरण

सत्तापालट ? नव्हे, हे तर बंगाल चे सांस्कृतिक पुनर्जागरण

NEWS डंका 2 weeks ago

बंगालला सांस्कृतिक वारशापासून दूर लोटणाऱ्यांच्या विरोधातला निकाल

श्रीकांत पटवर्धन

'हे नवबालका, जन्माच्या प्रथम शुभ क्षणी दाखव तुझ्या नव्या स्वरुपाची झलक !' - रवींद्रनाथ टागोरांनी या काव्यपंक्ती बंगालच्या नित्यनूतन, चिरतरुण स्वत्वाच्या आविष्काराला आवाहन करण्याच्या हेतूने लिहिल्या.

बंगालमध्ये पारंपारिकरित्या हे गीत गुरुवर्य रवीन्द्रनाथांच्या जन्मदिनी गायले जाते. टागोरांनी हे जाणले होते, की ही मातृभूमी केवळ बदलत नाही, ती पुनःपुन्हा नव्याने जन्म घेते.

हा एक अतिशय आनंददायी योग म्हणावा लागेल, कि गुरुवर्य टागोरांच्या १६५ व्या जन्मदिनाच्या केवळ सुमारे एक आठवडाभर आधी, म्हणजे ४ मे २०२६ रोजी, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप ला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक ही केवळ सत्ता पालटाचे साधन नसून, ती बंगालच्या सांस्कृतिक गतवैभवाचे पुनर्जागरण करण्याची संधी होती, आणि आहे.

आज वेळ आहे, क्षणभर थांबून, राजकीय वादविवाद काही काळ बाजूला ठेवून, काही अत्यंत महत्वाचे गहन प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे शोधण्याची. काय आहे खरा बंगाल ? काय आहे, खरी बंगाली संस्कृती ? आणि कसे करावे लागेल तिचे पुनर्जागरण ? सध्याचा बंगाल समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या भूतकाळात डोकवावे लागेल. केवळ गत दशकांच्या नव्हे, तर काही शतकांच्या भूतकाळात.

युक्रेन युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर?

देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी

'रत्नागिरी मराठा ज्ञाती'च्या बालविकास विद्यामंदिरचे १००% यश

तामिळनाडूत विजय यांचे सरकार येण्याचा मार्ग झाला मोकळा

पंधराव्या शतकात, गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या नवद्वीप गावात निमाई नावाने ओळखला जाणारा एक तरुण (जो पुढे चैतन्य महाप्रभू म्हणून प्रसिद्ध झाला) कीर्तन करीत, गात असे. त्यांची कीर्तने हे केवळ संगीत नसून, ती भक्तीच्या वेशात प्रगट होणारी सामाजिक सुधारणेची चळवळ होती. ते भक्तीच्या भावावेशात त्याकाळी अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना किंवा पूज्य विद्वानांना, सारख्याच प्रेमाने आलिंगन देत, त्यांच्या बरोबर नाचत. त्यांनी ठासून सांगितले, की हरीनाम हे सर्वाना सहज उपलब्ध असून, सर्वांचा त्यावर सारखाच अधिकार आहे, त्यात कुठल्याही भेदांना स्थान नाही. वैष्णव संप्रदायाची जी गुढी त्यांनी उभारली, ती पुढे बंगालच्याच नव्हे, तर भारताच्या आध्यात्मिक संरचनेचा पाया बनली; सर्वसमावेशक आणि अत्यंत आनंददायी भक्ती चळवळ.

गेल्या तीन शतकांचा इतिहास पाहिला, तर बंगालने देशाच्या नैतिक, आध्यात्मिक उत्कर्षामध्ये केवळ भाग घेतला, असे नसून, त्याचे काही प्रमाणात पुढारीपण ही केल्याचे दिसते. सती सारख्या सामाजिक कुप्रथांच्या विरोधात जागृती आणि लढा उभारून शेवटी ती दुष्ट प्रथा कायद्याने बंद करून घेणारे राजा राममोहन रॉय. पुढे त्यांची चळवळ (ब्राह्मो समाज) शिक्षणाच्या आधारे पुढे नेऊन, शिक्षणाला विशेषतः स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा , सक्षमतेचा आधार बनवणारे ईश्वरचंद्र विद्यासागर. देशाला पहिली महान कादंबरी (दुर्गेशनंदिनी, १८६५) आणि त्यातले महान गीत 'वंदेमातरम' देणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय . हीच वंदेमातरम ची गर्जना पुढे स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य वीरांच्या तोंडून पुढे शतकभर देशात घुमत राहिली, आजही ते गीत देशवासीयांना स्फूर्ती देते.

कादंबिनी गांगुली यांच्या रूपाने बंगालने देशाला पहिली महिला डॉक्टर दिली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले बलिदान विसरता येणार नाही.

बंगालने आजवर देशाला जेव्हढी म्हणून महान व्यक्तिमत्त्वे दिली, त्यामध्ये आपल्या प्रखर तेजाने, असामान्यतेने तळपणारे स्वामी विवेकानंद. १८९३ च्या शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेले ऐतिहासिक भाषण - ज्यात त्यांनी हिंदू धर्माच्या महानतेची जगाला ओळख करून दिली. मात्र देशात परत आल्यावर, त्यांनी तितक्याच स्पष्टपणे आपल्या देशवासीयांना हेही सांगितले, की उपाशी माणसाला तत्त्वज्ञान सांगण्यात अर्थ नसतो आणि देवीची, कालीमातेची उपासना केवळ देवळात नव्हे, तर देशातील सामान्य स्त्रीच्या रुपात ही करावी लागेल.

तर हा आहे बंगाल. फार पूर्वीपासून तो तसा आहे. पंतप्रधान मोदींच्या नजरेतून बंगाल हा असाच दिसतो. आता याचा अर्थ असा नव्हे, की आपल्याला बंगाल पूर्वी होता तसा करायचा आहे; किंवा असे तर मुळीच नव्हे की त्याला दुसऱ्याच एखाद्या परकीय संरचनेच्या साच्यात बसवायचे आहे. आपल्याला बंगालची हरवलेली सांस्कृतिक अस्मिता जागृत करून त्याला पुन्हा एकदा आपल्या वैभवशाली वारशाला शोभेल अशी स्थिती गाठून द्यायची आहे.

मध्यंतरीच्या बऱ्याच काळात, बंगालमधील बुद्धीजीवी वर्ग आणि राजकीय नेत्यांनी बंगालचा हा पारंपारिक वारसा कुठल्याशा न्युनगंडात्मक भूमिकेतून सतत नाकारला, त्याज्य ठरवला. आणि त्याच्या जागी सर्वस्वी परकीय विचारधारा आपल्याशा केल्या. परिणाम हा झाला, की विकासाचा वेग खुंटला, संस्थात्मक संरचना ढासळत गेली, आणि जे कोणी धर्म व संस्कृतीबद्दल बोलतील, त्यांना दमदाटीने, धाकाने गप्प केले जाऊ लागले. खरेतर ही संस्कृती बंगालच्या स्वत्वाशी निगडीत आहे, तिचा बंगालच्या प्रगतीशी मुळीच विरोध नसून, उलट ती प्रगतीला पूरक आहे.

त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा केवळ राजकीय सत्तापालट नसून, तो जनमताचा कौल आहे. आणि तो त्यांच्या विरोधात आहे, ज्यांनी बंगालला आपल्या सांस्कृतिक वारशापासून, आपल्या मुळांपासून आणि मूल्यांपासून तोडले. पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची संधी नव्हे, तर बंगालला त्याचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा पुन्हा मिळवून देण्यासाठी केलेला यज्ञ होता.

नरेंद्र मोदी यांचे बेलूर मठ आणि स्वामी विवेकानंद यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सर्व विदित आहेत. 'नारायण भावाने नराची सेवा' - हे रामकृष्ण मिशन चे ब्रीदवाक्य, हाच मोदींच्या कार्याचा मुलभूत आधार आहे. बंगालला त्याचा वैभवशाली वारसा परत मिळवून देणे, याचा अर्थ जिथे चैतन्य महाप्रभू नाचले, गायिले, त्या गंगेच्या घाटांवर अत्याधुनिक मुलभूत सेवा सुविधा उभ्या करणे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी ज्या तऱ्हेच्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे यांची स्वप्ने पाहिली त्या प्रत्यक्षात उभ्या करून बंगालला शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा मानाचे स्थान मिळवून देणे. डोंगराळ प्रदेशात राहिल्याने राजकीय नेतृत्वाकडून सतत उपेक्षित राहून, मुलभूत सोयी सुविधाही न मिळालेल्या आदिवासी बांधवांची स्वप्ने पूर्ण करणे.

तेव्हा, - 'हे नवबालका ….. दाखव तुझ्या नव्या स्वरुपाची झलक !' - ह्या गुरुवर्य टागोरांच्या काव्यपंक्तीनेच बंगालमधील पहिल्या भाजप सरकारचा कार्यारंभ होत आहे. गेल्या सुमारे अर्धशतकामध्ये असे चित्र होते, की जणू काही बंगालने आपले स्वत्व, आपला आत्मा गमावला आहे. पण नाही; आज या निवडणुक निकालानंतर ते नवबालक, त्याच्या नित्यनूतन चिरतरुण स्वरूपाचे नव्याने दर्शन घडवणार आहे. समृद्धी आणि शांतते च्या मार्गावर बंगालची वाटचाल पुन्हा नव्याने सुरु होणार आहे, सुरु राहणार आहे.

( संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या टाईम्स ऑफ इंडिया मधील लेखावर आधारित)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka