खर्च वाचवून एआय आणि रोबोटॅक्सीवर भर
जगभरातील प्रसिद्ध कॅब सेवा कंपनी उबरने मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी सुमारे ३,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असून, ही कपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या जवळपास १० टक्के आहे.
गेल्या काही वर्षांत कंपनीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून, त्यातून व्यवस्थापनाचे अनेक स्तर आणि विविध टीम्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे संघटनेची रचना अधिक सोपी करून निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे उबरने स्पष्ट केले आहे.
उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोवशाही यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात कंपनीला अधिक कार्यक्षम आणि वेगवान बनवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या पुनर्रचनेत केवळ कर्मचाऱ्यांचीच संख्या कमी केली जाणार नाही, तर व्यवस्थापकांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी घटवली जाणार आहे. काही व्यवस्थापकांना नोकरीतून कमी न करता थेट काम करणाऱ्या भूमिकांमध्ये पाठवले जाणार आहे. तसेच एक-दोन सदस्यांच्या छोट्या टीम्सची संख्या जवळपास निम्मी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समान स्वरूपाची कामे करणारे विभाग एकत्र करून कंपनीचा खर्च आणि कामकाज अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जाणार? याचिका न्यायालयाने फेटाळली
भारताच्या अर्थव्यवस्थेला जपानच्या जेसीआरकडून 'ए' रेटिंग
राम मंदिराच्या सीईओपदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
उबरच्या कामकाजाच्या पद्धतीतही मोठा बदल होणार आहे. कंपनीने बहुतांश कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले असून, पूर्णपणे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ सुमारे १ टक्क्यापर्यंत मर्यादित केली जाणार आहे. कंपनीच्या मते, टीम्समध्ये प्रत्यक्ष संवाद आणि सहकार्य वाढल्यामुळे कामाची गती आणि निर्णयक्षमता सुधारू शकते.
दरम्यान, या नोकरकपातीमधून होणारी बचत कुठे वापरली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उबर ही बचत कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित वाहनं आणि रोबोटॅक्सीच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर खर्च करण्याच्या तयारीत आहे. स्वयंचलित वाहतूक क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी उबरने विविध तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी आणि गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारला आहे. कंपनीचा स्पष्ट संदेश आहे की, पारंपरिक कॅब व्यवसायासोबतच भविष्यातील चालकविरहित वाहतूक व्यवस्थेतही उबरला आघाडीवर राहायचे आहे. त्यामुळे ३,३०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय हा केवळ खर्च कमी करण्याचा प्रयत्न नसून, उबरच्या व्यवसायाला एआय आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या दिशेने वळवणाऱ्या मोठ्या बदलाचा संकेत मानला जात आहे.

