पुणे: तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी (ता. २९) रात्री दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. दोन्ही महिलांनी साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट बांधून घेत एकत्रितपणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी रात्री काहीतरी तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर दोन महिलांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी तातडीने आळंदी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढले. त्यावेळी या दोन्ही महिला एकमेकींना साडीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
मृतांमध्ये एका महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे आणि दुसऱ्या महिलेचे वय ३५ वर्षांच्या आसपास आहे. या महिला नेमक्या कोण होत्या आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवले आहेत. या महिला माय-लेकी होत्या की नातेवाईक, याचा तपास आळंदी पोलिस करत आहेत. परिसरातून कोणी महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याचीही पडताळणी पोलिस करत आहेत.

