चेन्नई (तमिळनाडू): तिरुमंगलमजवळील शिवराकोट्टई येथे विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
शिवराकोट्टई येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून घसरलेल्या कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर कार दुचाकीवर जाऊन आदळली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार भरधाव वेगात महामार्गावरून जात असताना दुचाकीला जोराची धडक देते. या धडकनेनंतर कार अनियंत्रित होत दुसऱ्या लेनमध्ये शिरते. कार हवेत उडेत आणि तिसऱ्या लेनमध्येही प्रवेश करते. यावेळी ती इतरही काही गाड्यांना धडक देते. अवघ्या काही सेकंदात ही भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, इतर दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोटारीमधील आर. कानगवेल (वय 62), त्यांची पत्नी कृष्णाकुमारी (वय 51), त्यांची सून नागज्योती (वय 28) आणि तिची मुलगी शिवा अथमिका (वय 8) अशी मृतांची नावे आहेत. तर जी. पांडी (52) या निलायुर येथील फळविक्रेत्याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. १०) पहाटे 6 वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे.

