मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात लिसाडी गेट पोलिस आणि स्वाट टीमने संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ तयार पिस्तुले, ५ अर्धवट तयार पिस्तुले, मॅगझिन, शस्त्रनिर्मितीचे सुटे भाग आणि मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिरूर तालुक्याचे सुपुत्र आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक मेरठ विनायक भोसले यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक (शहर) विनायक गोपाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्राधिकारी कोतवाली यांच्या देखरेखीखाली लिसाडी गेट पोलिस व स्वाट टीमने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हुमायून नगर, लोहियानगर परिसरातील वसीमच्या बेसमेंटजवळील घरावर छापा टाकला.
छाप्यात वसीम (रा. जामिया चौक), आफताब (रा. हुमायून नगर) आणि नदीम (रा. चमडा पैठ) या तिघांना अटक करण्यात आली. शिवाय, मोठ्या प्रमाणात शस्त्रे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून खालील साहित्य जप्त केले आहे…
४ तयार ३२ बोर पिस्तुले
५ अर्धवट तयार ३२ बोर पिस्तुले
२ तयार व ३ अर्धवट मॅगझिन
पिस्तुलांचे विविध सुटे भाग
ड्रिल मशीन, प्लेट कटर, वेल्डिंग साहित्य, आरी, हातोडे, प्लास, रेती, लोखंडी प्लेट्स व इतर शस्त्रनिर्मितीची उपकरणे
गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुजुकी अॅक्सेस स्कूटर.
या प्रकरणी लिसाडी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६२/२०२६ नोंद करण्यात आला असून शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/५/१२/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी वसीम याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आफताब याच्याविरोधात हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हे नोंद आहेत. नदीम याच्यावरही याच प्रकरणातील शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित कारवाई लिसाडी गेट पोलिस ठाण्याचे प्रभारी दलवीर सिंह, स्वाट टीमचे प्रभारी उपनिरीक्षक मनीष कुमार शर्मा तसेच लिसाडी गेट पोलिस ठाणे आणि स्वाट टीममधील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वी केली. पोलिसांनी अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…
IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…
जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…
महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…

