पुणे: व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करून कात्रजमधील लॉजवर बोलवायचे आणि मग लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या युवतींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी रचलेल्या एका बनावट ग्राहकाच्या खेळामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला १६ जुलै २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. कात्रज भागातील एका लॉजमध्ये काही दलाल ग्राहकांच्या व्हॉट्सॲपवर महिलांचे फोटो पाठवत होते. "यातील मुलगी निवडा," असे सांगून ग्राहकांकडून मुलगी पसंत केली जायची. मग त्यांना लॉजवर बोलवलं जायचे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तात्काळ एक प्लॅन तयार केला. पोलिसांनी दलालांना पकडण्यासाठी चक्क बनावट ग्राहक तयार केले आणि त्यांच्यामार्फत दलालांशी संपर्क साधला.
मुख्य दलाल तुकाराम मनाळे याने सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकांना कात्रज येथील 'किनारा लॉज' येथे पाठवण्यात आले. दलालाने ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना खोलीत पाठवले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. इशारा मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने थेट लॉजच्या रूमवर धाड टाकली. खोलीचा दरवाजा उघडताच तिथे परराज्यातील दोन पीडित युवती दिसल्या. पोलिसांनी या दोन्ही युवतींची सुटका केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य दलाल तुकाराम दत्ता मनाळे (वय २२, रा. सध्या तीनहत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याला रंगेहात अटक केली आहे. तुकाराम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…
हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…

