सातारा: ठाण्याच्या शाहपूर येतील जलसंधारण विभागात कार्यरत असलेले सरकारी अभियंते लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची कराड शहरात कारने चिरडून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन तपासणी केली, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
तपासाअंती हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झाले.
आरोपी पत्नी सारिका मंडले हिने आपला भाऊ आणि प्रियकराच्या मदतीनेच पतीचा काटा काढल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. सारिका हिचे वयाने ११ वर्षे लहान असणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये मागील तीन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. तसेच तिला पती लक्ष्मण मंडले यांच्याकडूनही त्रास होत होता. त्यामुळे सारिकाने आपल्या प्रियकराला तीन लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा कराड पोलिसांनी मंडले यांच्या हत्येत प्रत्यक्ष सामील असलेला सारिकाचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मृत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) हे जलसंधारण विभागात कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती ठाणे जिल्ह्याच्या शहापूर येथे होती. ५ जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाण्याहून कराडकडे येत होते. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पत्नीला फोनवरून दिली होती. तसेच पहाटे आपल्याला न्यायला ये, असेही त्यांनी पत्नीला सांगितले होते. ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास जेव्हा ते कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात गाडीतून उतरून पायी घरी निघाले होते, त्याच वेळी आरोपींनी त्यांना पाठिमागून कारने जोराची धडक दिली. आरोपींनी तीन वेळा कार मागेपुढे करून त्यांना चिरडून ठार मारलं आणि तिथून फरार झाले.
तपासादरम्यान मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले आणि तिचा प्रियकर प्रथमेश थोरात यांचे २०२३ पासून प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. कापड दुकानात काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. पतीकडून मिळणाऱ्या त्रासाला कंटाळून आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी सारिकाने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी तिने प्रियकर प्रथमेशला तब्बल ३ लाख रुपये दिले होते. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली असून कोर्टाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली…
सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…

