अजित पवार यांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या पत्रावर सही न करता बैठकीतून निघून येणारे एकमेव आमदार म्हणजे प्राजक्त तनपुरे. त्यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला एक मोठं खिंडार पडलं आहे
६ एप्रिलचा दिवस - राहुरी पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले होते. रखरखत्या उन्हात एक फोन येतो. अर्ज मागे घे. तुला आमदार बनवण्याची जबाबदारी माझी. आणि प्राजक्त तनपुरे निवडणुकीतून माघार घेतात. त्यांना माघार घेऊन आमदार बनवण्याचे आश्वासन देणारे असतात देवेंद्र फडणवीस. १ महिन्याआधी दिलेला शब्द आता पूर्ण होताना दिसत आहे. अर्थात याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचा आज झालेला भाजप पक्षप्रवेश.
अजित पवार यांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या पत्रावर सही न करता बैठकीतून निघून येणारे एकमेव आमदार म्हणजे प्राजक्त तनपुरे. त्यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला एक मोठं खिंडार पडलं आहे. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेणारे प्राजक्त तनपुरे यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे तसेच त्यांचे आजोबा हे देखील राजकारणात सक्रिय होते. प्राजक्त तनपुरे हे २०१९ च्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून आमदार झाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षे ते राज्यमंत्री देखील होते. परंतु सत्तेच्या बाहेर राहून प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्यापेक्षा प्रवाहात सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप विधानपरिषदेला पाठवणार आहे.
त्यांच्या पक्षप्रवेशाने अहिल्यानगर हे भाजपमय होणार आहे. आधी विधानपरिषदेची ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जायची, परंतु भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळ पाहता ही जागा भाजपने आपल्याकडे खेचली आहे. अनेक नेत्यांनी प्राजक्त तनपुरे यांचे पक्षात स्वागत जरी केले असले, तरी त्यांना उमेदवारी देण्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नेत्यांना प्राजक्त तनपुरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देणार असल्याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. एकूणच त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. त्यामुळे ऐनवेळी पक्षाच्या बाहेरील नेत्यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याची भावना निर्माण होत आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यात आला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा ही चर्चा जेव्हा केली जाते, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हा आश्वासक चेहरा असल्याबद्दल नेहमी बोललं जातं. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखत फडणवीस यांनी केलेली ही खेळी आहे, असं म्हटलं जात आहे. तनपुरे कुटुंबीय आणि विखे कुटुंबीयांमधील राजकीय वैर हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. याआधी देखील विखे पाटील यांचे विरोधक विवेक कोल्हे यांना आमदार करून फडणवीसांनी बळ दिलं होतं.
प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेतल्यानंतर भाजपचं बळ जिल्ह्यात अधिक वाढणार आहे. प्राजक्त तनपुरे यांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. मोठा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या सहकारी कारखान्यांचे व शैक्षणिक संस्थांचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. त्यांच्या या प्रवेशाने अनेक बाजार समित्यांचे संचालक, साखर कारखान्यांचे संचालक, माजी नगरसेवक तसेच अनेक कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे. शिवाय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार गटाचे निलेश लंके यांची ताकद देखील प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून भाजप कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूणच प्राजक्त तनपुरे यांच्या बहरल्याने कमळही अहिल्यानगरमध्ये चांगलं बहरणार आहे.
CNG Rate Hike : महागाईचा फटका! मुंबईत सीएनजी महागलं, नवे दर काय?

