कॉक्रोच जनता पार्टी जेन झी आणि जेन अल्फाच्या मागे लागली आहे. 'स्कूल ठिक करो', अभियान चालवले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरात 'छात्रों की गुंज' हा उपक्रम राबवतायत. अचानक या मंडळींसाठी हा वयोगट इतका महत्वाचा का झाला आहे?
'छात्रो की गुंज' या कार्यक्रमासाठी राहुल गांधी आज पुण्यात आहेत. पुणेकरांना आज स्टॅण्डअप कॉमेडीचा लाभ होणार. इथे पैसे फेकून तरुणांना जमा केल्याचे आरोप आयोजकांवर होतायत. रिल्स बनवण्यासाठीही भरपूर पैसे वाटले जात आहेत. तरुणांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी ताकद लावली जात आहे. हे नवे टुलकिट आहे. हेही विदेशातून आले आहे. डेटा एनॅलिसिसमधून त्याचा जन्म झालेला आहे. २०२९ ची लोकसभा निवडणूक हे त्यांचे लक्ष्य आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात छात्रो की गुंजचे ८०० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुण्यासारख्या एज्युकेशन हबमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आजूबाजूला काँग्रेसच्या काळात निर्माण झालेल्या शिक्षण संस्थांचे जाळे असल्यामुळे हे शिक्षण सम्राट हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताकद लावणार हे उघड आहे.
काँग्रेसची निवडणूक रणनीती लक्षात घ्या. एकगठ्ठा मुस्लीम मते आणि हिंदूंमधील काही गटांची मते हे काँग्रेसच्या विजयाचे समीकरण राहीलेले आहे. संपूर्ण वंदेमातरमला सोनिया गांधी यांनी केलेला विरोध हा एकगठ्ठा मुस्लीम मतांची मोट टीकवण्यासाठीच आहे. पूर्वी जातीपातीच्या नावावर मतदान करणाऱ्या हिंदूंच्या मतांची या एकगठ्ठा मतांमध्ये भर पडायची. आज त्यातला एक मोठा वर्ग हिंदू म्हणून मतदान करतो, त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचे हे समीकरण बिघडलेले आहे. विजय निश्चित करायचा असेल तर मुस्लीम एकगठ्ठा मतांमध्ये एक नवा गट जोडणे काँग्रेसला भाग आहे. काँग्रेस पक्ष देशाच्या सत्तेवर उणीपुरी ६ दशके राहीला. त्या काळात काँग्रेसला कधीही छात्रो की गुंज आठवली नाही, आज तोच काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांकडे आशेने पाहातो आहे.
जेन-झीला अचानक महत्व का आले? हा वयोगट म्हणजे १८ ते २९. 'यूएन वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट २०२४' ची आकडेवारी सांगते की, भारतातील जेन झी वयोगट एकूण लोकसंख्येच्या २९.२ टक्के असून त्यांची एकूण संख्या ४०७ दशलक्ष इतकी आहे. निवडणुकीच्या काळात हा वयोगट ज्याच्या बाजूला त्याचीच सत्ता ही बाब उघड आहे. दुर्दैवाची बाब अशी की, हा वयोगट पालकांच्या हातून कधीच निसटला आहे आणि सोशल मीडियाच्या कह्यात गेलेला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून या गटाला सरकारच्या विरोधात उभे करणे सोपे आहे, हा विचार काँग्रेसच्या उपक्रमामागे आहे. उपक्रम काँग्रेसचा असला तरी डेटाच्या आधारे हे टुलकिट निर्माण केले आहे, विदेशी शक्तींनी.
अलास्कातील विमान दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू
राष्ट्रभक्तीचे आवरण घालून काँग्रेस स्वतःला किती लपवणार?
हे कसले आंदोलन…राहुल गांधी तर चॉकलेट, गोळ्या फेकत होते!
राजस्थानातील ६११ सरकारी शाळा अजूनही इमारतीविना
ज्यांच्या जन्म २००४ नंतर झाला आहे, जे दहा वर्षाचे असताना म्हणजे ४ थी किंवा पाचवीत असताना मोदी सरकार सत्तेवर आले, या वयोगटाने त्यांच्या जाणत्या वयात देशात दहशतवाद पाहीलेला नाही, यूपीएच्या भ्रष्टाचाराचे किस्से त्यांना ठाऊक नाहीत. पाकिस्तानच्या समोर नांगी टाकण्याचा, पाकिस्तानसमोर सरपटण्याचा काँग्रेसचा इतिहास त्यांना माहित नाही. नेहरुंच्या काळापासून राजीव गांधी यांच्या काळापर्यंत काँग्रेसने देशाचे वाट्टोळे त्यांना ठाऊक नाही. या इतिहासात त्यांना रस नाही. त्यांची पाटी कोरी आहे. त्यांना लक्ष्य करणे काँग्रेससाठी तुलनेने सोपे आहे.
अभिजीत दिपके आणि त्याच्या सोबत जे टोळके आहे, त्यांनी स्कूल ठिक करो… मोहिम हाती घेतली आहे. शाळांमध्ये सुधारणा करा, या उपक्रमामागे राजकारण असू शकेल, असा विचार सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीला सुमारे तीन वर्षांच्या काळ शिल्लक आहे. अगदी नेमका आकडा हवा असेल तर तीन महिने कमी धरा. आज जी मुले ९ किंवा दहावीला आहेत. त्यापैकी अनेकजण या निवडणुकीत पहील्यांदा मतदान करणार आहेत. शाळेत एक विद्यार्थी असला तरी त्याच्या घरी आणखी किमान दोन मतदार असतात. एका विद्यार्थ्याच्या मतावर प्रभाव टाकला तर कदाचित त्याच्या पालकांच्या मतावरही त्याचा परीणाम होऊ शकतो. कॉकरोच जनता पार्टीने जे आंदोलन सुरू केले आहे, त्या मागे हे गणित आहे.
आपल्या रजिस्टार जनरल एण्ड सेन्सस कमिशनरने २०२६ च्या लोकसंख्येचा जो अंदाज जाहीर केला आहे. त्यात जेन झीची राज्य निहाय संख्या देण्यात आली आहे. जेन झीचा सगळ्या मोठा टक्का बिहारमध्ये आहे (३६.६), त्या खालोखाल उत्तर प्रदेश (३३.९), राजस्थान (३२.३), जम्मू काश्मीर (३१.०), महाराष्ट्र (२६.२०). ही आकडेवारी पाहील्यावर तुमच्या लक्षात येईल की कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहारमध्ये का सुरू आहे.
देशातील प्रत्येक शाळेत जाण्याची कॉकरोच जनता पार्टीची ताकद नाही, त्यांना जायचे सुद्धा नाही. ते एका शाळेत जातील, तिथला एक मोठा मुद्दा उपस्थित करतील. तो सोडवला जाईल किंवा नाही, परंतु त्यांना त्याचे श्रेय निश्चितपणे मिळेल. जे काही घडले त्याचे मीम्स, व्हीडियो मात्र लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचवता येतील. त्याचा प्रभावही निर्माण करता येईल. यात खोटयाचे खरे करण्याची आम आदमी पार्टीची परंपरा दिपके आणि टोळी पुढे चालवताना दिसते आहे. राजस्थान सरकारने शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी ४२२ कोटी रुपयांची तरतूद आमच्याच आंदोलनामुळे झाली, अशी बोंब आता दिपके ठोकतो आहे. वस्तूस्थिती अशी आहे की, राजस्थान सरकारचा निर्णय १२ जुलैचा आहे. ज्याची बातमी पुढच्या आठ दिवसात देशाच्या महत्वाच्या वर्तमान पत्रात आली. जेव्हा दिपके आणि टोळी जंतर मंतर पेटवण्यात बिझी होती. 'स्कूल ठिक करो…' आंदोलन सुरूही झाले नव्हते. परंतु सोशल मीडियावर भरपूर पैसे खर्च केले की, हे आमच्यामुळेच घडले ही थाप पसरवता येते. लोक त्याच्यावर विश्वासही ठेवतात.
जेन झी वर्ग भवितव्याबाबत प्रचंड चिंतातूर असतो. हा वयोगट अत्यंत भावनाप्रधान असतो. यातील काहींना पैशाचे खूप मोठे आकर्षण असते. महत्वाचा मुद्दा म्हणजे यांचा बराच वेळ सोशल मीडियावर जात असतो. जंतर मंतरचे आंदोलन पेटवण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा वापर करण्यात आला. करीयर, भावनाप्रधान मानसिकता, सोशल मीडियाची पकड आणि मुठभर लोकांना पैसेही वाटण्यात आले. त्यासाठी मेटा सारख्या कंपन्यांनी मोठा पैसा घेऊन त्यांची मदत केली.
पाकिस्तानी गॅंगस्टर आणि आयएसआय़चा हस्तक शहजाद भट्टी याचे सोशल मीडियावर मोठे जाळे आहे. त्याच्या जाळ्यातील २०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात सुद्धा जेन-झींची संख्या ९० टक्के आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश तोडण्याचे काम कसे केले जात आहे, त्याची ही दोन ठसठशीत उदाहरणे.
जेन झीचा बराच वेळ सोशल मीडियावर जातो. सोशल मीडियावर जे येते ते खरे असते, असा त्यांचा विश्वास असतो. त्या कंटेटमध्ये करण्यात आलेली सत्यासत्याची सरमिसळ त्यांच्या लक्षात येत नाही. जे सोशल मीडिया वापरतात, त्यांचे सायकॉलॉजिकल प्रोफाईल सोशल मीडिया कंपन्यांकडे असते. अल्गोरिदमचा खेळ त्यावरच सुरू असतो. कोणाच्या समोर कोणता मेसेज वाढायचा हे त्या कंपन्यांना व्यवस्थित ठाऊक असते. या कंपन्याही या खेळात केवळ प्रेक्षक नसून एक टीम म्हणून सहभागी झाल्या आहेत, हे जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनातून बऱ्यापैकी उघड झाले आहे.
देशाच्या सुदैवाने राहुल गांधी 'छात्रो की गुंज'चे कार्यक्रम देशभरात घेत असताना झारखंड, कर्नाटक, हिमाचलमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. राहुल गांधी तिथे फिरकतही नाहीत, तिथे 'छात्रो की गुंज' ऐकू येत नाही, हे आतापर्यंत तरुणांच्या लक्षात आलेले आहे. दिपकेचा खोटारडेपणाही आता उघड होतो आहे, जयपूरमध्ये आशुतोष रांका आणि त्याच्यासोबतच्या लोकांना बडवून पळवून लावण्यात आले, त्यातून हे पुरेसे स्पष्ट व्हावे. याचे कारनामे लोकांच्या समोर उघड झाल्यावर छात्रो की अशी काही गुंज येईल की या रिजिम चेंजवाल्यांना पाय लावून पळावे लागले.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

