Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद

दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद

पाकिस्तानस्थित आयएसआय हँडलर शहजाद भट्टीच्या निर्देशानुसार करत होते काम

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पंजाबमधील चार संशयितांना अटक केली आहे. पाकिस्तानस्थित आयएसआय (ISI) हँडलर शहजाद भट्टीच्या निर्देशानुसार दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणण्याचा कट हे आरोपी रचत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

एसीपी विवेक कुमार त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश राणा आणि निरीक्षक अशोक यांच्या पथकाने दिल्ली आणि पंजाबमध्ये संयुक्त कारवाई करत ही टोळी उघडकीस आणली. तपासात आरोपी पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क ठेवण्यासाठी विदेशी मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे समोर आले. हे क्रमांक त्यांना पाकिस्तानमधून पुरवण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत शुभदीप सिंह उर्फ विशाल (२३), गुरजंट सिंह उर्फ ऋषी, साजन सिंह उर्फ हनी (२८) आणि गगनप्रीत (२४) या चौघांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी पंजाबमधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून एक जिगाना पिस्तूल, एक .३० बोर पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

स्पेशल सेलला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाकिस्तानमधून कार्यरत असलेला आयएसआय हँडलर शहजाद भट्टी दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पंजाबमधील काही तरुणांचा वापर करत होता. तांत्रिक माहिती आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे दिल्ली आणि पंजाबमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यातून या चौघांपर्यंत पोलिस पोहोचले.

पहिली कारवाई अमृतसरमधील मजीठा रोड परिसरात करण्यात आली. तेथून शुभदीप सिंहला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने पाकिस्तानातील शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संपर्क असल्याची कबुली दिली. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून शस्त्रे आणि अमली पदार्थ मागवले जात असल्याची माहितीही त्याने दिली.

पुढील तपासात गुरजंट सिंह आणि साजन सिंह यांना पंजाबमधून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून आणखी एक जिगाना पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. २४ जून रोजी दिल्लीतून गगनप्रीतलाही अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत.

तपासात गगनप्रीतला दिल्लीतील धार्मिक स्थळे, पोलिस ठाणे आणि पोलिस पिकेट्सची रेकी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले. या ठिकाणांचे व्हिडिओ तयार करून भविष्यात गोळीबारासारखी घटना घडवण्याचे निर्देश त्याला पाकिस्तानी हँडलर्सकडून मिळाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'मेक इन इंडिया'ला जपानचा पाठिंबा! अर्थकारण, संरक्षण, सेमिकंडक्टर भागीदारीला चालना

पाकिस्तानातील १२५ वर्षे जुन्या गुरुद्वाराच्या तोडफोडीवर भारताचा संताप

इंधनटंचाईवर मात करण्यासाठी रशियाची भारतातून पेट्रोल आयात

डे-केअरमध्ये चिमुकल्यांचा छळ; टॉयलेट जेटस्प्रेने पाणी, वॉशिंग मशीनमध्ये कोंडले

मुख्य आरोपी शुभदीप सिंह हा पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील असून त्याचे गाव भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यात तो सक्रिय होता. यापूर्वीही त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. गुरजंट सिंह हाही तरनतारणचा रहिवासी असून तो विदेशी क्रमांकांच्या माध्यमातून आयएसआय हँडलर्सशी संपर्कात होता. साजन सिंह उर्फ हनी हा त्याचा चुलत भाऊ असून त्याच्याविरोधातही यापूर्वी अमली पदार्थांच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. फतेहगढ साहिब जिल्ह्यातील गगनप्रीत हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आला होता आणि त्याच्यावर दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka